आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक द चेन:आजपासून रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी; डेल्टा प्लस व्हेरिएंट अन् संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे निर्बंध

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकांनो काळजी घ्या : अत्यावश्यक सेवेसंबंधित दुकाने, आस्थापना सुरू तर मॉल्स, सिनेमागृहे राहतील बंद

जिल्ह्यात ४ जून २०२१ रोजी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर २.०५ टक्के तर ऑक्सिजन बेड व्यापलेली संख्या १७.६५ टक्के नोंदवल्यामुळे शासनाकडून पहिल्या स्तरात जालन्याचा समावेश झाला. यामुळे सर्व सेवा, आस्थापना व उपक्रम सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ७ जूनपासून परवानगी दिली. मात्र, काही दिवसांतच कोरोना रुग्णांसह मृत्यू वाढले, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोकाही वाढला. यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले अाहे. अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी शनिवारी याबाबतचे आदेश काढले असून यात सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदीत मेडिकल इमर्जन्सी वगळता सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुक्‍तपणे संचार करण्‍यास मनाई राहील. तसेच आरोग्‍य, पोलिस, महसूल, अग्‍निशमन, महावितरण, नगरपालिका व नगरपंचायत कार्यालये, आपत्ती व्‍यवस्‍थापन किंवा कोविडविषयक कामकाजाशी संबंधित सर्व कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ये-जा करण्‍यास सूट राहील. मात्र, यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ओळखपत्र बाळगणे आवश्‍यक राहील. तसेच जमावबंदीत दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी एकावेळेस ५ पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्‍यास मनाई आहे. मात्र, पूर्व परवानगी घेतलेले नियोजित कार्यक्रम, लग्‍नसमारंभ, अंत्यविधीत ही मर्यादा वगळण्यात आली.

उत्पादक घटक
उत्पादक, निर्यात जबाबदाऱ्या पुर्ण करण्याची आवश्यकता असलेली उद्योगक्षेत्रे, लघु व मध्यम उद्योग, अत्यावश्यक वस्तु निर्माण करणारे उद्योग, सातत्याने व निरंतर चालु असणारी उद्योगक्षेत्रे, उद्योग, डाटा सेंटर, क्लाउड सर्व्हिसेस, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र आदी नियमित सुरू राहणार आहे. तर इतर सर्व निर्माण क्षेत्र जे अत्यावश्यक तसेच निरंतर उद्योग सदराखाली समाविष्ट नाहीत ते सर्व ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.

या सेवा-सुविधा बंद
मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीनसह), नाट्यगृहे पूर्णत: बंद असणार आहेत. तसेच सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद असतील. मात्र, धार्मिक सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक आणि धार्मिक सेवा करता येतील.

फिरत्या पथकांची असेल नजर
पोलिस प्रशासन, सर्व तहसीलदार, नगरपालिका, नगरपंचायत, गटविकास अधिकारी यांनी त्‍यांच्या स्‍तरावर फिरते पथक स्‍थापन करून सार्वजनिक स्‍थळी नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत खातरजमा करावी. विशेषतः लग्‍न समारंभ, रेस्‍टॉरंट्स, इतर गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्‍याचे निदर्शनास आल्‍यास आवश्‍यक ती दंडात्‍मक कारवाई, असेही आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता इशारा
कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेड्स व्यापण्याच्या टक्केवारीत वाढ झाल्यास नव्याने प्रतिबंधात्मक आदेश काढले जातील, असा इशारा रवींद्र बिनवडे यांनी ६ जून रोजी काढलेल्या आदेशात दिला होता.

या सुविधा राहणार सुरू
अत्यावश्यक व इतर सेवा

अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने व आस्थापना दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. यातही औषधी दुकाने पूर्णवेळ सुरू असतील. इतर दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद राहतील. दरम्यान, दुकानाच्या प्रवेशाच्या ठिकाणी किंवा काउंटरसमोर एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. कृषी व कृषिपूरक सेवाही दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

रॅस्टॉरंट्स : ५० टक्के क्षमतेने बसून जेवण्यास सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत रेस्टॉरंट्स सुरू राहतील तर शनिवार व रविवारी पार्सल, होम डिलिव्हरी सुरू राहील. तसेच दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा, घरपोच सुविधा देता येतील. तर शनिवार व रविवारी बसून जेवता येणार नाही मात्र पार्सल किंवा घरपोच सुविधा देता येईल.

सार्वजनिक ठिकाणे, मैदाने : दररोज पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने फिरणे, सायकल चालवण्यासाठी सुरू असणार आहेत.

खासगी आस्थापना : सूट दिलेला वर्ग वगळता दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

क्रीडा : पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत बाहेर खेळता येईल.

कार्यक्रम, मेळावे, धरणे, आंदोलन
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, करमणूकीचे कार्यक्रम, मेळावे, धरणे, आंदोलने, मोर्चे आदी पूर्वपरवानगीने दुपारी ४ वाजेपर्यंत घेता येतील. मात्र, यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक असेल. यासोबतच बैठक, निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा ५० टक्के क्षमतेने घेता येतील.

लग्न समारंभ, अंत्यविधी
लग्न, समारंभात ५०, तर अंत्यविधीच्या वेळी फक्त २० लोकांनाच उपस्थित राहता येईल.

बांधकाम
केवळ ऑनसाइट कामगार किंवा मजुरांनी दुपारी ४ वाजेपर्यंत कामाच्या ठिकाणाहून निघून जावे. तर केवळ बांधकामाच्या ठिकाणी मजूर राहत असल्यास अशीच बांधकामे सुरू राहतील, दुपारी ४ वाजेनंतर तेथील मजुरांना ये-जा करण्यास मनाई राहील.

व्यायामशाळा व इतर
व्यायामशाळा, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स ५० टक्के ग्राहक क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. याठिकाणी एसीचा वापर करता येणार आहे.

वाहतूक व्यवस्था
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १०० टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील मात्र बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. तसेच मालवाहू वाहतूक नियमित सुरू राहील. त्याचप्रमाणे खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास नियमित सुरू असेल. मात्र, ५ व्या स्तरातील जिल्ह्यातून कुणी येत असेल तर ई-पास बंधनकारक असेल.

बातम्या आणखी आहेत...