आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन सुरू:लग्न समारंभाला 2 तासांची परवानगी अन् पाहुणेही 25 हवे, नियमांचे उल्लंघन केल्यास ठोठावला जाणार 50 हजार दंड

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना आपत्तीच्या नियंत्रण व व्यवस्थापनासाठी ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश

जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून आतापर्यंत ४० हजार २०१ रुग्ण बाधित झाले असून उपचारादरम्यान ५५७ जणांचा बळी गेला आहे. तर सध्या ६ हजार ६९१ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बाधितांसह मृतांची संख्या वाढतच असून कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी २२ एप्रिल रात्री ८ वाजेपासून १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध कडक केले आहेत. यानुसार लग्न-समारंभ २५ पाहुण्यांमध्ये अवघ्या दोन तासांत उरकावा लागणार असून नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजारांचा दंड संबंधित कुटुंबास ठोठावला जाईल तर कोरोना महामारी आपत्‍ती म्‍हणून अधिसूचित असेपर्यंत हॉलवरही बंदी घालण्यात येणार आहे. यात सर्व शासकीय कार्यालये (राज्य, केंद्र, स्थनिक प्रशासनाशी संबंधित) हे केवळ १५ % कर्मचारी उपस्थिती क्षमतेनेच कार्यरत राहतील. मात्र, कोरोना महामारीशी संबंधित थेट कामकाज करणाऱ्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले. अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांत कोणत्याही परिस्थितीत ५० % पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थिती नसावी. आवश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती देखील कमी करावी, परंतु आवश्यकतेनुसार १०० % पर्यंत उपस्थिती वाढवण्यास परवानगी राहणार आहे.

खासगी प्रवासी वाहतूक केवळ आवश्यक सेवांसाठी
बस वगळता खासगी प्रवासी वाहतूक केवळ आपत्कालीन किंवा आवश्यक सेवांसाठी किंवा ड्रायव्हरसह बसण्याच्या क्षमतेच्या ५० % वैध कारणांसाठी परवानगी राहील. हे नियम जिल्ह्यांतर्गत वाहनांना लागू नसून प्रवासी निवासी असलेल्या शहरांनाच लागू राहतील. एखाद्या अत्यावश्यक सेवेसाठी किंवा किंवा अंत्यसंस्कारासारख्या घटनेत किंवा कुटुंबातील गंभीर आजारपणाशी संबंधित कामासाठी आवश्यक असल्यास आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवासास परवानगी राहणार आहे.

हातावर मारणार क्वॉरंटाइनचा शिक्का
बस सेवा ऑपरेटरने शहरातील थांबे जास्तीत जास्त दोन ठेवावे व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास त्या थांबे व वेळांबाबत माहिती द्यावी. स्थानिक आपत्‍ती व्यवस्थापन प्राधिकरण इच्छित असल्यास हे बदलण्यास सांगू शकतात. ज्या ठिकाणी थांबे आहेत तेथे उतरणाऱ्या प्रवाशांच्‍या हातावर १४ दिवस होम क्वाॅरंटाइनचे शिक्के संबंधित बससेवा पुरविणाऱ्यांनी मारणे बंधनकारक राहील. थर्मल स्कॅनरचा वापर करावा. लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे.

संचारबंदीच्या पालनासाठी २०० पोलिसांचा बंदोबस्त
जालना शहरात संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये म्हणून २०० पोलिस कार्यरत करण्यात आले आहेत. यात तपासणीसाठी पोलिसांना ३६ पॉइंट नेमून दिले आहेत. या पॉइंटवरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी, तपासणी केली जात आहे. पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दुपारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताबाबतचे नियोजन मागविले आहे. डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी बंदोबस्त नेमण्याबाबतचा अहवाल पाठविला आहे. जालना शहरातील सदर बाजार, कदीम, चंदनझिरा, तालुका या पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनीही आपापल्या हद्दीत कसे नियोजन केले, कोणत्या ठिकाणी नाके आहेत, कोणत्या ठिकाणी तपासणी केली जाणार, सकाळी, दुपार, संध्याकाळच्या सुमारास कसे नियोजन राहणार याबाबतचे नियोजन पाठविण्यात आले आहे.

सूचनांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
कुठल्याही व्यक्तीकडून आदेशातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केली जाईल. त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तर अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचेही बिनवडे यांनी दिलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या चौकांवर लक्ष, होमागार्ड मदतीस
जालना शहराच्या रिंग रोडवरील औरंगाबाद, अंबड, मंठा, सिंदखेड, देऊळगावराजा, भोकरदन या चौफुल्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या ठिकाणाहूनच जास्त करून नागरिकांची शहरात ये-जा होत असते. या पार्श्वभूमीवर संबंधित ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या पोलिसांसाठीचे हे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावून कारवाया करणार आहेत. तसेच दीडशे होमगार्डही मदतीला राहणार आहेत.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे नियम
राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या स्वतःच्या बसेसला ५० % आसन क्षमतेने वाहतुकीची परवानगी असेल. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी राहणार नाही. आंतरशहर किंवा आंतरजिल्हा प्रवासासंदर्भात लांब पल्ल्याच्या रेल्वे व बस सेवांवरही नियंत्रण राहणार आहे. यात स्थानिक रेल्‍वे / महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्‍थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास त्यांच्या कार्यक्षेत्रात सदर रेल्वे/बसद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविडसंबंधीत तपासणीसाठी आवश्यक सर्व माहिती द्यावी लागेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण थांबे असलेल्या ठिकाणी प्रवशांची Rapid Antigen Test करण्याचे काम संबंधित प्राधिकृत लॅबला देऊ शकतील. तर कोविड चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशांकडून घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

बातम्या आणखी आहेत...