आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:जालन्याचा राज्यात डंका, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिक्षकांचे कौतुक

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालनाच नव्हे तर अख्या राज्याला शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या जालन्याच्या शिक्षकाची थेट राज्याच्या व्हीडीओ कॉन्फरंसीग मध्ये राज्यभर चर्चा झाली. शिक्षक दिनी झालेल्या संवादात जालन्याचा राज्यभर डंका झाला. ही बाब जालन्याच्या शिरपेचात नवा तुरा रोवणारी ठरली.

जालना जिल्हयाच्या मंठा तालुक्यातील श्रीराम तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने रोजगारानिमित्त पालकांसोबत स्थलांतरीत होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शंभर टक्के स्थलांतर रोखुन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात निरंतर ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक जगदीश श्रीकृष्ण कुडे यांनी सांगितले की, श्रीराम तांडा येथील बहुतांश रहिवासी दरवर्षी ऊसतोड व विटभट्टी कामासाठी कुटुंबासह स्थलांतर करतात. यामुळे शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या पाल्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असे. हे नुकसान टाळण्यासाठी शाळाबाह्य व स्थलांतरीत मुलांना श्रीराम तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी त्यांचे स्थलांतर रोखून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. सन २०१२ पासून विद्यार्थ्यांचे शंभर टक्के स्थलांतर रोखण्यात शाळेला यश आले आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत सध्या १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झालेले जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्रीराम तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्यमंत्री यांनी कौतुक केल्याबद्दल जगदीश कुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखिळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगल धुपे, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, रवी जोशी, गीता नाकाडे यांच्यासह डॉ. प्रफुल्लता भिंगोले, संतोष लिंगायत, राजाराम बोराडे, संतोष मुसळे, उध्वव बाजड, आब्दुल्ला हुसेन, प्रभा जाधव, कौतिकराव जंजाळ, शामराव टेकाळे, बी.एल. जेठेवार, सुनिल ठाकरके यांच्यासह संदीप पोटे आदींची उपस्थिती होती.

शिक्षकांचे वेतन खात्यात वेळेवर जमा व्हावे : मुख्यमंत्री शिंदे शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना विभागाला देतानाच केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील त्याचबरोबर शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री. केसरकर यांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बीड जिल्ह्यातील सोमनाथ वाळके व शशिकांत कुलथे या दोन शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी भिवंडी, सिंधुदूर्ग, पुणे, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, हिंगोली, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशीम, उस्मानाबाद, वर्धा, येथील शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. दरम्यान, जालन्यातही तालुक्यातून एक असे आठ शिक्षकांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. ऐनवेळी तांत्रिक अडचणींमुळे मराठवाड्यातून उस्मानाबादला संवादाची संधी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...