आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅग केली लंपास:दोनशे रुपये खाली टाकून नऊ लाख केले लंपास; बदनापूर शहरात पोलिस ठाण्याजवळ घडला प्रकार

बदनापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यावर २०० रुपये खाली टाकून आमिष दाखवत दोन अज्ञात व्यक्तींनी एका कापूस व्यापाऱ्याची नऊ लाख रुपये असलेली दुचाकीवर लावलेली बॅग लंपास केली. ही घटना बदनापूर पोलिस ठाण्यापासून ५०० मीटर अंतरावर धोपटेश्वर चौकाजवळ भरदिवसा घडल्याने खळबळ माजली आहे.

बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथील जनार्दन बाबूराव चाटे हे कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस बदनापूर येथील धोपटेश्वर रस्त्यावर असलेल्या श्री जी जिनिंगमध्ये नेऊन विक्री करतात.

कापूस विक्रीचे ११ लाख रुपये जिनिंग मालकाकडे झाल्याने १ फेब्रुवारी रोजी फिर्यादीने जालना येथील मित्र नरेश रामकिसन फटाले यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात ही रक्कम आरटीजीईएसद्वारे वर्ग करून घेतली व त्यानंतर मित्रांसह जालना येथील बँकेत जाऊन दोन लाख रुपये काढले.

त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जनार्दन चट्टे व नरेश फटाले हे दोघे बँकेत गेले व खात्यातील उर्वरित रक्कम ९ लाख रुपये बँकेतून काढून कापडी पिशवीत मोटरसायकलच्या हँडलला टांगून अडीच वाजेदरम्यान बदनापूरला आले. नरेश फटाले यांना औषधी घ्यायच्या असल्याने फिर्यादीने त्यांना मेडिकलवर सोडले. स्वतः चेक घेण्यासाठी जिनिंगकडे निघाले असता धोपटेश्वर चौकाजवळ जाताच पाठीमागून दोघेजण दुचाकीवर आले आणि जनार्दन चट्टे यांना थांबवत “तुमचे पैसे खाली पडले’ असे सांगितले.

चट्टे यांनी मोटारसायकल थांबवली व खाली उतरून रस्त्यावर पडलेल्या दोन शंभर रुपयांच्या नोटा उचलत खिशात घातल्या. तोपर्यंत त्या दोघांनी चट्टे यांच्या मोटारसायकलवर असलेली कापडी पिशवी पळवली. हेल्मेट घातलेले असल्यामुळे आरोपी ओळखता आले नाहीत. पोलिस उपअधीक्षक, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आदींनी भेट दिली. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...