आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:जालन्यातील अग्रसेन भवनमध्ये उभारले 110 खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर; पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 15 दिवसांत 80 लाखांचा हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारणार

शहरातील अग्रसेन भवन येथे सुसज्ज व सर्व सोयी-सुविधायुक्त जम्बो ११० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रविवारी फीत कापून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी सौम्य व मध्यम लक्षणांच्या रुग्णांवर होणार उपचार होणार असून येत्या १५ दिवसांत ८० लाखांचा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रकल्प येथे साकारणार असल्याचे मंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले. आमदार कैलास गोरंट्याल, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अर्चना भोसले, डाॅ. संजय जगताप, डाॅ. सर्वेश पाटील, मेट्रन ज्योती बुरमुदे, महाराजा अग्रेसन फाउंडेशनचे संचालक डाॅ. रामलाल अग्रवाल, बी. आर जिंदल, सतीश तवरावाला, अरुण अग्रवाल आदींची यावेळी उपस्थिती होती.

टोपे म्हणाले, कोविडबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता खाटांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अग्रसेन भवन या ठिकाणी ११० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबधितांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी पुरेसे मनुष्यबळ, औषधी तसेच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती तसेच आमदार निधीतून हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून या सेंटरच्या उभारणीसाठी मदत केलेल्या सर्वांचे मंत्री टोपेंनी आभार मानले.

आमदार गोरंट्याल यांनी दिले १ कोटी रुपये
जालना । शहरातील अग्रसेन भवन येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी १ कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक विकास निधीतून हा खर्च केला जाईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यातून १०० ऑक्सिजन सिंलिडर, ५० हॉस्पिटल बेड, मॅट्रेस आणि पिलो, १५ मल्टिपॅरा मॉनिटर, २५ हजार आयव्ही सोडियम क्लोराइड सलाइन आणि इंजेक्शन, १० हजार इंजेक्शन पँटोप्रोजोल ४० व १० मिली, २० हजार इंजेक्शन सेट्रायझोन, ३० हजार इंजेक्शन मेथॉल, पेडनीसॉलन ४० मिली, १६ हजार इंजेक्शन लो मॉलिक्युलर वेट हॅप्रीन, ४ हजार ५२४ टॅब्लेट फेव्हिफिरावेअर २०० मिली ३४ स्ट्रिप व १ हजार जनरल एक्झामिनेशन ग्लोव्हज १०० पॅकेट साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. या साहित्य खरेदीस मंजुरी दिल्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.

असे अाहे केअर सेंटर
जेईएस कॉलेज रोडजवळ अग्रसेन भवनात पाच दिवसांत ११० खाटांचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. प्रत्येक खाटाला ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली. एकच हॉल असल्यामुळे सर्व रुग्णांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवरचाही ताण कमी होऊन याठिकाणी रुग्णांना चांगले उपचार मिळतील. याठिकाणी डॉक्टर व नर्सेसला प्रशिक्षण देऊन रुग्णांवर उपचार केले जातील, असे डॉ. संजय जगताप यांनी सांिगतले.

८० लाख रुपये खर्चून प्रकल्पाची उभारणी
लिक्विड ऑक्सिजनवर अवलंबून न राहता कोरोनाच्या रुग्णांना पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने ऑक्सिजन पुरवठा व्हावा, यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ८० लाख रुपये खर्चून येत्या १५ दिवसांत या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले.

मनुष्यबळ कमी असल्याने नुकत्याच उत्तीर्ण झालेल्यांना संधी - ११० खाटांच्या या कोविड केअर सेंटरची क्षमता २०० खाटांपर्यंत नेली जाणार आहे. यासाठी साधारणत: २४ डॉक्टर व ८० नर्सेसची गरज लागणार आहे. सध्या १० डॉक्टर व ४० नर्सेस दिल्या असून वाढती गरज लक्षात घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी डॉक्टर तसेच नर्सेसची भरती करण्याचे निर्देश मंत्री टोपे यांनी दिले. याबाबतचा प्रस्ताव पाठवा लगेच सही करतो, असेही ते म्हणाले. यामुळे आवश्यक मनुष्यबळ भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...