आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हलगर्जीपणामुळे वाढला धोका:शहरामध्ये बिनधास्त फिरताहेत कोरोना स्प्रेडर; पकडलेल्या 70 जणांची 45 मिनिटांत अँटिजन टेस्ट, चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी, एसपी, डीएचओंनी रखरखत्या उन्हात अंबड चौफुलीवर उभारले अँटिजन टेस्टिंग सेंटर
  • विनाकारण फिरणाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांची जागेवरच अॅँटिजन टेस्ट करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला असून वारंवार सूचना, विनंती, अावाहन करूनही काही जण नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. अशाच विनाकारण व किरकोळ कामानिमित्त फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, एसपी विनायक देशमुख व डीएचओ डॉ. विवेक खतगावकर यांनी घेतला. यावर अंमल करत अंबड चौफुलीवर एका ज्यूस सेंटरमध्येच सोमवारी दुपारी ३ वाजता अॅँटिजन टेस्टिंग सेंटर सुरू केले. या वेळी शहरात येणाऱ्या ७० जणांची टेस्ट केली असता, ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. तिघे कोरोनाबाधित हॉस्पिटलचे कारण सांगून घराबाहेर निघाले होते. या वेळी कोरोनाबाधितांच्या मुक्त संचाराचा अंदाज येताच टेस्टिंगची मोहीम गतिमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले. या पद्धतीने टेस्टिंग वाढवून कोरोनाची साखळी तोडता येईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला.

या वेळी पोलिस उपधीक्षक सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पीआय प्रशांत महाजन यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी मास्क बांधणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असून यासाठी शहरापासून गाव-खेड्यांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. याला काहींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, तर काही जण दुर्लक्ष करत आहेत.

शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत ५ एप्रिल रोजी निर्बंध कडक केले, तर १४ एप्रिलपासून राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून १८ एप्रिलपासून भाजीपाला, फळे आदी विक्रीसाठी सकाळी ७ ते १ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली. मात्र, यालाही न जुमानता बिनधास्त फिरून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांचा अंदाज जिल्हा प्रशासनाला अवघ्या ४५ मिनिटांच्या टेस्टिंगदरम्यान आला. यामुळे शहरासह जिल्ह्यातही तपासणी मोहीम राबवण्याचे अादेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले. तसेच आवश्यक टेस्टिंग किट व कर्मचारी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही दिली.

चौघांपैकी दोघे नॉर्मल
अॅँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या दोघांना कुठलीही लक्षणे नव्हती. एक जण सतकर कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे राहत असलेल्या जिल्हा परिषद माजी सभापतींच्या घरी जात होता, तर एक जण एका कंपनीच्या कामानिमित्त औरंगाबादहून जालन्यात आला होता. इतर दोघे पती-पत्नी आपल्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होते.

जिल्हा प्रशासन रस्त्यावर, पोलिसांचा आत्मविश्वास वाढला
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, डीएचओ असे प्रमुख अधिकारी रस्त्यावर येऊन वाहनचालकांना थांबवून अॅँटिजन टेस्ट करण्याचे आवाहन करत आहेत. नियम पाळा, विनाकारण घराबाहेर फिरू नका, स्वत:सह इतरांची काळजी घ्या, जिवाला जपा, अशा सूचना करत असल्याचे पाहून बंदोबस्तावरील पोलिसांचा आत्मविश्वासही वाढला. त्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत शेकडो वाहनधारकांना अडवून चौकशीअंती ७० जणांना टेस्ट करण्यासाठी सेंटरवर आणले.

पालन करा, अन्यथा कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. जर कुणी विनाकारण फिरत असल्यास पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील. तसेच अशा लोकांची अॅँटिजन टेस्टही करण्यात येईल. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून यात नागरिकांनी सहकार्य करायला हवे. रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना

दोघे कोरोना पॉझिटिव्ह असतानाही दुचाकीवरून जात होते हॉस्पिटलला
पोलिसांच्या चौकशीत पती-पत्नी दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे माहिती असतानाही दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये जात होते. इतर एक जण होम क्वॉरंटाइन असूनही मित्राला सोबत घेऊन फिरत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किमान दोन मीटरचे अंतर पाळण्याचे आवाहन शासनाकडून सातत्याने केले जात असतानाही काही जण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढत असून याला रोखण्यासाठी स्वयंशिस्तीवर भर देण्याची गरजही या वेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

त्रिसूत्रीवर आरोग्य यंत्रणेचा फोकस
बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेणे, त्यांची तपासणी करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास उपचार करणे या त्रिसूत्रीवर आरोग्य यंत्रणेचा फोकस असून इतर ठिकाणीही टेस्ट केल्या जात आहेत. मात्र, शहर असो की गाव जागोजागी टेस्टिंग सेंटर उघडून ये-जा करणाऱ्यांच्या टेस्ट केल्या तर बाधितांना लवकर शोधणे शक्य होऊन त्यांच्यावर संस्थात्मक अलगीकरणात उपचार करता येतील. जालना शहरात अनेक वाहनधारक विनाकारण फिरत आहेत. अंबड चौफुली येथे वाहनधारकांना पकडून त्यांची चौकशी करताना पोलिस कर्मचारी, अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...