आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालनेकरांनो सावधान!:कोरोनाने आठ दिवसांमध्ये 109 जणांना हिरावले; औषधोपचाराने 5,639 रुग्ण बरे

जालना3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना शहरातील अग्रसेन भवन येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण. - Divya Marathi
जालना शहरातील अग्रसेन भवन येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण.
  • जिल्ह्यात 25 एप्रिल ते 3 मेपर्यंत 20 हजार 532 नमुने तपासणीत 6 हजार 105 अहवाल पॉझिटिव्ह

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन-प्रशासनाकडून जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन अशा प्रकारे कडक निर्बंध लावूनही जिल्ह्यात संसर्ग कायम आहे. अवघ्या आठ दिवसांत १०९ रुग्णांना कोरोनाने हिरावून नेले असून ६ हजार १०५ जणांना बाधित केले आहे, तर दुसरीकडे लक्षणे दिसू लागताच तपासणी करून घेत वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार घेणारे ५ हजार ६३९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत. यामुळे जालनेकरांना अधिक सावध होण्याची गरज असून कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करण्यासह डॉक्टरांच्या निगराणीत उपचार घेणेही तितकेच महत्वाचे आहे. पात्र लाभार्थींनी लस घेऊन स्वत:सह इतरांना सुरक्षित करावे, असेही जाणकार सांगत आहेत.

दुसऱ्या लाटेत कोरोनाने शहराबरोबरच ग्रामीण भागात शिरकाव केला असून बाधितांसह मृतांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. यामुळे उपचारकामी बेड मिळवण्यासाठी रुग्णांसह नातेवाइकांना हॉस्पिटलमध्ये भटकंती करावी लागत आहे. याहीपुढे जाऊन गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पायपीट करावी लागत आहे. दुर्दैवाने मृत्यू झाल्यावर अंत्यविधीसाठीही स्मशानभूमीत रांगा लागत आहेत. मागील वर्षात वृद्धांसह सहव्याधी असणाऱ्यांना कोरोनाचा धोका तुलनेने अधिक होता, मात्र दुसरी लाट सर्वच वयोगटासाठी घातक ठरली आहे. यामुळे दुखणे अंगावर न काढता तातडीने स्वॅब तपासणी करून औषधोपचार घेणे फायदेशीर आहे. मागील आठवडाभरात ५ हजार ६३९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले.

चिंता आणि काहीसा दिलासाही
मागील महिन्यात २५ एप्रिलपर्यंत २ लाख ७३ हजार ३८१ नमुने तपासले होते. २५ एप्रिल ते ३ मे या आठ दिवसांत आणखी २० हजार ५३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातून ६ हजार १०५ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, तर याच कालावधीत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १०९ रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे ५ हजार ६३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ही दिलासा देणारी बाब ठरली.

बालके, विशीच्या आतील तरुण होताहेत बरे, पुढच्यांना धोका
जिल्ह्यात आतापर्यंत ८०३ जणांचा बळी गेला असून आरोग्य विभागाच्या २ मेच्या अहवालानुसार यात २० वर्षांच्या आतील एकही रुग्ण नाही. अर्थात लहान मुले, किशोरवयीन व २० वर्षांच्या आतील तरुणांमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र, २१ ते ३० वयोगटातील ११, ३१ ते ४० मधील ५३ अर्थात ४० पेक्षा कमी वयाच्या ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ४१ ते ५० मधील ९९, ५१ ते ६० मधील २०९, ६१ ते ७० मधील २४७, ७१ ते ८० मधील १३४, ८१ ते ९० मधील ४३ तर ९१ ते १०० मधील तिघांना कोरोनाने हिरावून घेतले.

एप्रिलमध्ये सर्वाधिक २८१ मृत्यू, १६ हजार ७०८ रुग्ण बरेही झाले
१ जानेवारी ते ३ मे २०२१ या चार महिने ३ दिवसांत जालना जिल्ह्यात ३६ हजार ५६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४४८ जणांचा बळी गेला आहे. यातही एप्रिल महिना सर्वाधिक घातक ठरला. या महिन्यात २० हजार १४८ रुग्ण कोरोनाबाधित झाले, तर उपचारादरम्यान २८१ जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षात कोरोना आल्यापासून १३ महिन्यांतील हा सर्वाधिक आकडा आहे. दरम्यान, सर्वाधिक १६ हजार ७०८ रुग्ण याच महिन्यात बरे होऊन घरी गेले ही समाधानकारक बाब राहिली हेही विशेष.

हीच ती वेळ…जे समजलंय त्याच्या अनुकरणाची; सुज्ञ व्हा, सुरक्षित राहा
प्रिय जालनेकरांनो,
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात तब्बल आठशे आप्तेष्ट जालनेकरांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत गेल्या चार महिन्यांत ४४४ जणांचा बळी गेला आहे, तर सर्वात चिंताजनक बाब म्हणजे गेल्या आठ दिवसांत आपण शंभर जिवाभावाचे लोक गमावले आहेत. हे सगळे नक्कीच भीतिदायक आहे. ४० हजार जालनेकरांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे ही सुखद बाब आहे. परंतु सध्या स्मशानात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची जी गर्दी होत आहे त्याकडे आपल्याला नक्कीच दुर्लक्ष करता येणार नाही. मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, नियमित हात धुवा आणि लक्षणे जाणवत असल्यास तातडीने तपासणी करून घ्या. कोरोनापासून वाचण्याचा हा मंत्र आपल्याला ज्ञात आहे. आपण त्याचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. बाजारातली गर्दी कमी झाली नाही तर स्मशानातली गर्दी वाढणार आहे. अजूनही मास्क न वापरता फिरणारांची संख्या मोठी आहे. काही जण दंड टाळण्यासाठी केवळ गळ्यात मास्क अडकवून फिरत आहेत.

फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे चित्र आहे. युवा वर्गाचे प्रमाण यात लक्षणीय आहे. त्यामुळेच जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ० ते ४० या वयोगटातील जवळपास ५० हून अधिक जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. याशिवाय सगळ्यात गंभीर बाब, जी आरोग्य विभागाच्या पाहणीत समोर आली आहे ती म्हणजे कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही अनेक जण सर्दी, खोकला, तापाची औषधी घेऊन किंवा खासगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोनाची तपासणी करण्याचे टाळत आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युदर वाढतो आहे. कोरोना येऊन आता एक वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी, पोलिस व प्रशासन काम करते आहे. त्यांच्यावर कामाचा ताण आहे. परिस्थितीपुढे हात न टेकता प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कोरोनाशी दोन हात करीत आहेत. आपण सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर आपला कोरोनापासून बचाव होईल. हा सामूहिक सुज्ञपणा प्रशासनावरचा ताण हलका करू शकतो आणि आपल्याला सुरक्षितही ठेवू शकतो. - कृष्णा तिडके, ब्युरो चीफ

बातम्या आणखी आहेत...