आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:जालन्यात मालकाच्या मारहाणीनंतर नोकराने केली मालकिणीची हत्या, नोकराला पोलिसांनी उपचारांसाठी पाठवले, पण घरी जाऊन केला घात

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

योगा क्लास घेणारी मालकीण रागावली अन् मालकही बोलल्यामुळे राग अनावर झाला. यामुळे नाेकराने घरातील काचा फोडल्या. ती काच मालकाच्या पायात घुसल्याने मालकाने नोकराला चापट-बुक्क्याने मारले. यात नोकराचा दात पडला. रागारागात दोघे परस्परांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. पण रक्तबंबाळ अवस्थेतील दोघांना महिला पोलिसाने उपचारांसाठी जाण्यास सांगितले. पण नोकराने थेट घर गाठत मालकिणीवर चाकूने वार केले व स्वत: विष घेतले. यात संगीता आलोकचंद लाहोटी (६२) यांचा मृत्यू झाला. भीमराव धांडे (मंमादेवीनगर, जालना) असे आरोपी नोकराचे नाव आहे. जालना शहरातील अंबर हॉटेल परिसरात मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.

आलोकचंद व पत्नी संगीता लाहोटी हे दोघेजण एका नोकरासह राहत. चाळीस वर्षांपासून भीमराव त्यांच्याकडे आहे. संगीता योग शिक्षिका होत्या. यामुळे त्यांच्याकडे नेहमीच महिलांची ये-जा असे. दरम्यान, मंगळवारी सकाळी काही महिला त्यांच्या घरी आल्या होत्या. तेव्हा नोकर एका महिलेला बोलत होता व मोबाइल नंबर मागत होता. त्यामुळे संगीता यांनी पतीकडे तक्रार केली. यावरून आलोकचंद यांनी नोकरास चांगलेच झापलेे. रागात त्याने घराची काच फोडली. ही काच आलोकचंद यांच्या पायात घुसली. यामुळे त्यांनी नोकरास मारहाण केली. यात त्याचा दात पडला. दोघांमध्ये झालेल्या वादामुळे दोघेही जण सदर बाजार ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले. परंतु, त्या ठिकाणी एकच महिला पोलिस होती. त्या महिला पोलिसाने दोघांचे रक्त निघत असल्याचे पाहून “उपचारांसाठी जा, नंतर दोघांचीही तक्रार घेते,’ असे सांगितले. यानंतर मात्र नोकराने स्कूटीवरून घाईने घरी जाऊन घर बंद करून घेतले. आत घुसून किचनमधील चाकू घेऊन संगीता यांच्या पोटावर, छातीवर वार केले.

या मारहाणीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नोकरानेही विषारी औषध प्राशन केल्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला. तोपर्यंत आलोकचंद लाहोटीही घरी आले. परंतु, दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिस आल्यानंतर दरवाजा उघडून पाहिला तर संगीता लाहोटी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. जखमी नोकराला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, हत्या झालेल्या घरात सीसीटीव्ही फुटेज आहे. तपास करण्यासाठी डीव्हीआर नेण्यात आला आहे.

मुलगा अमेरिकेला, मुलगी अकोल्याला : मृत महिलेला एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगा अमेरिकेत आहे, तर मुलगी अकोल्याला राहते. यामुळे घरी नोकरासह दोघे पती-पत्नीच राहत होते.

बातम्या आणखी आहेत...