आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्घटना:टोपीचे दोरे क्रशरमध्ये अडकून कामगार जखमी, दुचाकीवरून रुग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू

जालना/ चंदनझिराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना एमआयडीसीतील सप्तशंृगी स्टील कंपनीजवळील घटना

थंडीपासून बचावासाठी अंगात घातलेल्या जॅकेटवरील टोपीचे दोरे स्लॅक क्रशरमध्ये अडकून तरुण खाली पडला. दुचाकीवर रुग्णालयात नेताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. जालना एमआयडीसीतील सप्तशंृगी स्टील कंपनी परिसरात शुक्रवारी रात्री ११.३० वाजेदरम्यान ही दुर्घटना घडली. ही माहिती मिळताच मित्र-परिवारासह नातेवाइकांनी शनिवारी सकाळी मृताच्या घराजवळ गर्दी केली. त्यानंतर कंपनीत जाऊन सुरक्षा रक्षकासह कर्मचाऱ्यांना मारहाण करून वाहनांचीही तोडफोड केली. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक मदतीचा धनादेश व रोख रक्कम देऊन भरपाईचे आश्वासन दिल्यावर हे प्रकरण निवळले. या वेळी चंदनझिरा पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात होता.

नीलेश बापूराव आढाव‌ (२४, कोडी कारला ह. मु. चंदनझिरा, जालना) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्रपाळी असल्यामुळे नीलेश नेहमीप्रमाणे कामावर आला होता. मागील काही दिवसांपासून थंडी वाढल्यामुळे त्याने अंगात जॅकेट व डोक्यावर टोपीही घातली होती. या वेळी खडे (लोखंड वितळल्यावर येणाऱ्या तरंगातील राखेचे तुकडे) अडकल्याने ते काढण्यासाठी नीलेश खाली वाकला. याच वेळी त्याच्या डोक्यावरील टोपीला बांधलेला बंद मशीनमध्ये अडकला व तो गोल-गोल फिरून अडकून खाली पडला. शेजारी काम करत असलेल्या सहकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी जखमी नीलेशला तातडीने बाजूला काढले. तसेच संबंधित लेबर काँट्रॅक्टर व कंपनी व्यवस्थापनासही माहिती दिली. तर दुचाकीवर बसवून उपचारासाठी जालना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जाऊ लागले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नीलेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

आई-वडिलांचा एकुलता एक; दहा दिवसांपूर्वी आला कामावर
नीलेश आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मागील १५-२० वर्षांपासून त्याचे कुटुंबीय कामाच्या शोधात जालन्यात स्थायिक झाले होते. इयत्ता बारावीनंतर पुढील शिक्षण घेत असताना तो कुटुंबाला हातभार म्हणून कमिशनवर पाण्याचे जार विकत होता. मात्र, सध्या पाण्याची विक्री मंदावल्याने तो १०-१२ दिवसांपासून स्लॅक क्रशरवर कामास जाऊ लागला. मात्र, नियतीने घात केला व स्लॅक क्रशरमध्ये अडकून नीलेशचा दुर्दैवी अंत झाला. मुलाचा मृत्यू झाल्याने त्याचे आई-वडील सुन्न झाले आहेत.

मशीनचे स्विच बंद करूनच काम करावे
स्लॅक क्रशर चालू-बंद करण्यासाठी जवळच एक स्विच असते. मशीनमध्ये एखादा स्लॅक खडे किंवा दगड अडकला किंवा काही बिघाड झाला तर स्विच बंद करूनच खडे काढायला हवा, तसेच दुरुस्ती करावी.शुक्रवारी रात्री जी दुर्घटना घडली, त्यातील तरुण मशीन सुरू असतानाच अडकलेला खडे काढत होता. यामुळे हा अपघात झाला असावा, अशी माहिती एका स्लॅक क्रशर मालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

असे चालते स्लॅक क्रशर मशीनचे काम
- स्टील कंपनीत भंगार वितळवून अँॅगल, सळई तयार केली जाते. या प्रक्रियेदरम्यान वितळलेल्या लोखंडावरील तरंग बाजूला काढतात.
- त्यापासून छोटे-मोठे खडे तयार होतात. हेच खडे स्लॅक क्रशर मशीनमध्ये टाकून त्यापासून वाळूसदृश बारीक चुरा तयार केला जातो.
- या चुऱ्यापासून विटा बनवल्या जातात. तसेच बांधकामासह प्लास्टरसाठीही याचा वापर केला जातो.
- जालन्यातील बहुतांश स्टील कंपन्यांनी अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामुळे लोखंडाच्या राखेची विल्हेवाट लागते, यातून दोन पैसेही मिळवता येतात.
- शिवाय, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र, शुक्रवारी नीलेशचा या स्लॅक मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser