आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यविधी ग्राऊंड रिपोर्ट:मृतदेह आणण्यापासून ते राख उचलेपर्यंतचे तीन तास धाकधुकीचे; पुरलेले दोन मृतदेह काढावे लागले बाहेर

जालना ​​​​​​​एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांची दाहकता पहाटे 5.30 वाजता स्वच्छता कर्मचारी वॉर्डात; दिवसभर कोरोना, अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार

कोरोनाचा उद्रेक वाढला असून, मृतांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्ण व सापडलेल्या अनोळखी मृतदेहांवर पालिकेच्या कामगारांना अंत्यविधी करावा लागतो. सकाळी ५.३० वाजताच वॉर्डातील स्वच्छतेचे काम पाहून नंतर ८ वाजेपासून हे स्वच्छता कर्मचारी मृतदेहांचे अंत्यविधी करतात. पोस्ट माॅर्टेम रुग्णालयातून मृतदेह आणून त्यावर अंत्यविधी करून अंगातील किट जाळण्यापर्यंत असलेले तीन तास धाकधुकीचे असतात. अनोळखी मृतदेहांवर दफनविधी केला जातो. परंतु, ४० दिवसांच्या आत नातेवाइकांचा आक्षेप आला तर त्या पुरलेल्या बॉड्याही बाहेर काढण्याची महिनाभरात दोनदा स्वच्छता कर्मचाऱ्यांवर वेळ आली.

जालना शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मृत्यू संख्येचाही आलेख वाढत चालला आहे. यामुळे रोजच्या मृतदेहांची विल्हेवाट लावत असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली. सकाळी नेमून दिलेल्या वॉर्डातील स्वच्छता करायची. यानंतर पोस्ट माॅर्टेम रुग्णालयातून मृतदेह आणायचे, नंतर सरण रचून अग्निडाग देऊन मृतदेहाची राख होईपर्यंत पुन्हा दुसरा मृतेदह आणण्याची दिनचर्या सुरू आहे. जिल्ह्यात रोज ५०० च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. यामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यातच जालना पालिकेकडे अंत्यविधी करण्यासाठी एकच शेड असल्यामुळे शेड वाढविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका संध्या संजय देठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच आमदार कैलास गोरंट्याल यांनीही या ठिकाणी शेड वाढविण्यात येणार असल्याचे नियोजनही सुरू केले.

आतापर्यंत मृत्यूची संख्या कमी असल्यामुळे एका शेडमध्ये सोयीस्कररीत्या अंत्यविधी होत होते. परंतु, आता रुग्णांची संख्या वाढत आहे, तशी मृतांची संख्याही वाढत असल्यामुळे मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी या ठिकाणी वेटिंग असते. मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने १२ जणांवर ही जबाबदारी दिली. परंतु, यातील काही स्वच्छता कर्मचाऱ्यांना वॉर्डातील स्वच्छता पाहून हे काम करावे लागते. यामुळे या कर्मचाऱ्यांना सकाळी वॉर्डातील स्वच्छता करून नंतर पुन्हा दिवसभर अंत्यविधीचे काम करावे लागते. अंत्यविधीसाठी स्वच्छता निरीक्षक संजय खर्डेकर, अरुण वानखेडे, राजू गवई, शोएब खान, श्रावण सराटे, दीपक तुपे आदी १२ जण काम पाहतात. दरम्यान, आता मृतांचे प्रमाण वाढल्यामुळे एकाचवेळी एका शेडमध्ये सहा-सहा मृतदेह जाळण्याची वेळ आली आहे.

कुणी आणतात बॉडी, कुणी देतो अग्निडाग
नेमलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवसभर कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. काही कामगार वाहनात मृतदेह आणतात तर काही जण त्या ठिकाणी अंत्यविधी करतात. मृतांचे नातेवाईक दूरवर थांबतात. कोरोनाचा मृतदेह पूर्ण बंद ठेवूनच सरणावर ठेवला जातो. यानंतर एक जण अग्निडाग देताे. मृतदेह पूर्ण जळेपर्यंत थांबून त्याची विल्हेवाट लावली जाते.

नगरपालिकेकडून अंत्यविधीच्या सर्व सुविधा
जसजसे मृतदेह असतील तसतसे अंत्यविधी उरकण्याचे काम केले जाते. कधी कधी रात्री १ वाजेपर्यंत अंत्यविधी करावे लागतात. अंत्यविधीच्या सर्व सुविधा पालिकेकडून पुरविल्या जातात. संजय खर्डेकर, स्वच्छता निरीक्षक, न.प.जालना.

बातम्या आणखी आहेत...