आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाची लस लवकरच येणार असून आरोग्य विभागाकडून लसीकरणाची पुर्वतयारी आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत जालना शहरातील जिल्हा रुग्णालय, अंबड येथे मत्स्योदरी स्कूल, तर बदनापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे कोरोनाची ड्राय रन घेण्यात आली. यात प्रत्येक केंद्रांवर २५ स्वयंसेवकांना लस देण्याचा सराव करण्यात आला.
शिवाय प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी केल्या जाणारी सर्व कार्यप्रणाली अवलंबण्यात आली. निवड करण्यात आलेल्या ७५ स्वयंसेवकांना मोबाईलद्वारे आधीच संदेश देण्यात आला होता.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना केंद्रावर भेट देऊन प्रक्रीयेची पाहणी केली. लस घेतली म्हणजे निश्चिंत झालो असे समजू नका. लसीकरणाचे रिझल्ट यायला वेळ लागू शकतो त्यामुळे आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा असे टोपे म्हणाले.
अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालय ऐवजी जवळच असलेल्या मत्स्योदरी विद्यालयात कोरोना लस देण्याचा ड्राय रन तब्बल वीस मिनीटे उशीराने सुरु झाला. यासाठी २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सायंकाळीच मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून केंद्रावर शनिवारी सकाळी ८ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु या केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांसह तहसीलदार विद्याचरण कवडकर, पोलिस उपनिरीक्षक मेंगडे हे सर्वांत अगोदर आले. नऊ नंतर एकेक कर्मचारी येऊ लागले. त्यामुळे ड्राय रन करण्यास वीस मिनीटे उशीर झाला.
या केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रांग लावली होती, त्यांच्या ओळखपत्राची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्यानंतर वेटींगरुमध्ये बसवले. त्यानंतर लसीकरण कक्षात लसीची माहिती देऊन लस टोचण्याबाबतचे रंगीत तालीम घेतली. लस दिल्यानंतर इंजेक्शन नष्ट करण्यात आले. लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यास अर्धातास निगराणी कक्षात ठेवण्यात आले. या दरम्यान, काही त्रास होत असेल तर या कक्षात तत्काळ प्राथमिक उपचार केले जातील, प्रकृतीत सुधारणा हाेत नसेल तर उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाईल, अशी रंगीत तालीम घेण्यात आली. या कामी संपर्क अधिकारी डॉ. सोनखेडकर, वैद्यकीय अधीक्षक जगन्नाथ तलवाडकर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.
कोरोना लस येत्या काही दिवसात येणार असली तरी याची पूर्व तयारी म्हणून शनिवारी सकाळी 7 ते 11 या वेळेत सेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाची ड्राय रन घेण्यात आली असून 25 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला यावेळी सर्व प्रथम पोलीस तपासणी, आधार तपासणी व नंतर लस अशा पद्धतीने एका व्यक्तीला 6 मिनिटांचा कालावधी लागला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.