आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलाराज:आज ठरणार पाचही नगरपंचायतींचे अध्यक्ष; मंठ्यात बिनविरोध, जाफराबादला उत्सुकता

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 नगरपंचायतींत असतील महिला अध्यक्षा; राष्ट्रवादी 2, सेना 1, भाजपला 1 नगरपंचायत

जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींचे अध्यक्ष आज ठरणार आहेत. यात मंठ्याला शिवसेनेच्या मीरा बोराडे यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्यांच्या निवडीची आज औपचारिक घोषणा होईल तर दुसरीकडे घनसावंगी आणि तीर्थपुरी येथे राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल. बदनापुरात भाजपचा अध्यक्ष होणार आहे, तर दुसरीकडे जाफराबादमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने येथील निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाफराबाद नगपंचायत निवडणुकीत शहराच्या ११ हजार मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्याने ही निवडणूक चर्चेची बनली आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून या निवडीसाठी राजकारणातील नेते, पदाधिकारी यांच्यासह दिग्गज मंडळींनी कंबर कसली आहे. ९ फेब्रुवारीला अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची तारीख होती. या दिवशी तब्बल तीन महिलांनी नामनिर्देशन दाखल केली आहेत. यात प्रभाग क्रमांक २ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा संजय लहाने, प्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष निवडून आलेल्या माजी नगराध्यक्षा कविता दीपक वाकडे तर प्रभाग क्रमांक ४ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मीराबाई शंकरलाल जैस्वाल या तीन नगरसेविकांनी अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन दाखल केलेली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून निवडून आलेले सर्व नगरसेवक सहलीवर गेलेले आहेत.

बदनापुरात भाजपच्या मंगला बारगजे यांची होणार निवड
बदनापूर | बदनापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपच्या चित्रा संतोष पवार यांनी बिनशर्त माघार घेतल्याने अध्यक्षपदासाठी भाजपच्या मंगला जगन्नाथ बारगजे यांची निवड होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असले तरी निवडणूक आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार आहे. बदनापूर नगरपंचायतच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबई येथे काढण्यात आली. त्यात अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी सुटल्याने नगराध्यक्षपद निर्विवाद भाजपकडे राहील यात काही शंका नाही परंतु उमेदवारी अर्ज दोघांचे अर्ज दाखल करण्यात आल्याने राजकीय हालचाली वाढल्या. आता कोण बाजी मारते याकडे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी होती. या दिवशी खरे चित्र स्पष्ट झाले. नगरपंचायतमध्ये १७ पैकी ९ भाजपचे नगरसेवक निवडून आले तर भाजप पुरस्कृत २ अपक्ष असे ११ नगरसेवक भाजपकडे आल्याने एकहाती सत्ता भाजपकडे आल्याने भाजपचा अध्यक्ष होणार असल्याचे निश्चित आहे.

तीर्थपुरीला राष्ट्रवादीच्या अलका चिमणे, शिवसेनेच्या सुनंदा चिमणे यांच्यात चुरस

तीर्थपुरी | तीर्थपुरी नगरपंचायतच्या नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ११, मित्रपक्ष भाजपचे २ व एक अपक्ष असे १४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तीर्थपुरी नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा लागणार हे जवळपास निश्चित झालेे. मात्र शिवसेनेच्या वतीने सुनंदा सचिन चिमणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने सदस्य फुटीला वाव मिळू नये म्हणून राष्ट्रवादी, मित्रपक्ष भाजप व अपक्ष असे सर्व १४ सदस्य सहलीला गेले. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या अलका चिमणे या पहिल्या अध्यक्ष म्हणून विराजमान होतील. दरम्यान, शिवसेनेचे ३ नगरसेवक निवडून आले असले तरी शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या काही नाराज व मित्रपक्ष भाजपसह अपक्ष नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती असून वरून सर्व आलबेल वाटत असले तरी आतून काही चमत्कार होतो का? याची शहरवासीयांना उत्सुकता लागली आहे.

असे आहे जाफराबादचे समीकरण
१ राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेवकासह राष्ट्रवादीचे ७, काँग्रेसचे ६, अपक्ष ३ तर भाजपचा १ असे १७ नगरसेवक निवडून आलेले आहेत. मात्र हे सर्व नगरसेवक गत दोन आठवड्यांपासून वेगवेगळ्या पक्षांसोबत सहलीवर असून यात कोण कुणासोबत आहे याचे कोडे आहे. त्यामुळे येथील निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंठ्यात सेनेच्या मीरा बोराडे होणार अध्यक्ष, एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवड निश्चित

मंठा । मंठा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे मीरा बालासाहेब बोराडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. एकूण १७ सदस्यांच्या नगरपंचायतमध्ये शिवसेनेचे १२, काँग्रेसचे २, भाजप २, राष्ट्रवादी १ असे संख्याबळ आहे.

निवडून आलेले जाफराबादचे सर्व नगरसेवक दोन आठवड्यांपासून सहलीवर घनसावंगीत राष्ट्रवादीला बहुमत : घनसावंगी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे पांडुरंग मुरलीधर कथले तर शिवसेनेच्या रेहानाबेगम फय्याज पठाण यांच्यात चुरस आहे. येथे राष्ट्रवादीला १० तर सेनेला ७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चत आहे.

जाफराबादला मोठा बंदोबस्त : जाफराबादच्या निवडीसाठी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अंजली कानडे, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार केशव डकले राहणार आहेत. यासाठी ५ पोलिस अधिकारी तर ५० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...