आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे अखेर सापडले. मात्र त्यांचा शोध लागण्याची कथा मोठी रंजक आहे. ताटे यांनी जालना ते शिरवळ हे जवळपास 350 किमीचे अंतर 10 दिवसांत चालून पार केले. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून ते शिरवळजवळच्या एका छोट्याशा हॉटेलच्या शेडमध्ये थांबले होते. शेजारीच असलेल्या एका मोठ्या हॉटेलचा वेटर राजू सिंग त्यांना थोडेफार जेवण द्यायचा. त्याच वेळी वेटरने ताटेंच्या हातावर लिहिलेला मोबाइल नंबर डायल केला आणि त्यानंतर सुरू झाली ताटेंची शोधयात्रा....
पुणे-बंगळुरू महामार्गावर असलेल्या शिरवळ (जि.सातारा) येथील कामत हॉटेलमधील वेटर राजू सिंग शुक्रवारी रात्री काम संपवून घरी निघाला होता. त्याच्या रूमपासून जवळच असलेल्या एका छोट्याशा हॉटेलच्या शेडमध्ये पुठ्ठा टाकून त्यावर एक अनोळखी व्यक्ती झोपली होती. वेटरने चौकशी केली, मात्र तो काहीच बोलायला तयार नव्हता. त्या वेळी वेटरने आपल्याकडे असलेले थोडेसे अन्न त्या व्यक्तीला दिले. दुसऱ्या दिवशीही वेटर कामावर निघाला तेव्हा तो तेथेच तसाच झोपून होता. त्यानंतर वेटरने त्या व्यक्तीला थोडेसे खायला दिले. सलग तीन दिवस दोन्ही वेळा हा वेटर त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्यायचा.
आता त्या वेटरची उत्सुकता वाढली होती. त्याने अधिक चौकशी केली, परंतु तो काहीच बोलायला तयार नव्हता. परंतु झोपलेल्या व्यक्तीच्या हातावर पेनने एक मोबाइल नंबर लिहिला होता आणि त्यापुढे "संग्राम' असे नाव लिहिले होते. वेटरने तो नंबर डायल केला. तो फोन रिसीव्ह केला नीलम संग्राम ताटे यांनी. गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेले पीआय संग्राम ताटे यांच्या पत्नीने. वेटरने नीलम ताटे यांना सर्व माहिती दिली. परंतु, नंतर वेटरचा फोन काही लागेना. तेव्हा नीलम ताटे यांनी संग्राम यांचे बॉचमेट असलेले पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना तो मोबाइल नंबर पाठवला.
त्यानंतर हनुमंत गायकवाड यांनी शिरवळ येथील युवा कार्यकर्ते युवराज ढमाळ यांना ही माहिती दिली. युवराज ढमाळ यांनी आजपर्यंत अनेक मतिमंद आणि हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात ते बजरंगी भाईजान म्हणून प्रसिद्ध आहेत. पीआय गायकवाड यांचा विश्वास सार्थ ठरवत बारामतीत असलेले युवराज ढमाळ यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि शिरवळ येथील ज्या मोबाइल नंबरवरून ताटे यांच्या घरी संपर्क साधण्यात आला होता, त्या व्यक्तीचा शोध घेतला.
त्या वेटरला घेऊन ताटे जिथे झोपलेले होते तिथे ढमाळ पोहचले. त्यांनी हनुमंत गायकवाड यांना फोटो पाठवले. गायकवाड यांनी फोटो पाहून ताटे यांची ओळख पटवली आणि मग तातडीने खंडाळा पोलिस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे आणि त्यांचे इतर सहकारी तेथे पोहोचले आणि त्यांनी ताटे यांना रुग्णालयात दाखल केले.
ताटे झाले होते अशक्त
गेल्या दहा-बारा दिवसांपासून पीआय ताटे सतत चालत होते. त्यातच पुरेसे अन्नही न मिळाल्याने ते अशक्त झाले होते. जेव्हा पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा ते उभेही राहू शकत नव्हते. दोघा-तिघांनी हाताला धरून त्यांना उभे केले व रुग्णालयात दाखल केले. आता ताटे यांना त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गायकवाड सरांमुळे तपास
दौंड पोलिस प्रशिक्षण केंद्रातील आमचे मित्र पीआय हनुमंत गायकवाड यांनी मला तो नंबर पाठवला. त्या नंबरचा शोध घेणे माझ्यासाठी आव्हान होते. कारण तो नंबर सातत्याने व्यग्र येत होता. परंतु तो एका हॉटेलात वेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलो. त्यानेच आम्हाला ताटे साहेबांपर्यंत पोहचवले. हनुमंत गायकवाड यांच्यामुळेच हे शक्य झाले.
वेटरची सतर्कता महत्त्वाची
त्या वेटरने आमचे मित्र संग्राम ताटे यांना जेवण दिले, शिवाय त्यांच्या हातावरचा नंबर डायल केला. त्याने जी माणुसकी आणि सतर्कता दाखवली त्यामुळेच ताटे यांचा शोध लागू शकला. आमच्या मित्राचा शोध लागल्याने मोठा आनंद झाला आहे. - हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक, दौंड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.