आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठी तुटेपर्यंत मारहाण:समोर आले जालन्यात व्हायरल होणाऱ्या अमानुष मारहाणीच्या व्हिडिओचे सत्य, आता 'त्या' पोलिसांवर कारवाईची मागणी; वाचा नेमके काय घडले?

कृष्णा तिडके, जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालन्यात एका स्थानिक नेत्याला पोलिसांकडून अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि काही कर्मचारी एका व्यक्तीला काठी तुटेपर्यंत मारहाण करताना दिसत आहेत. पीडित व्यक्ती वारंवार त्या पोलिसांना हात जोडून विनंती करत होती की मला मारू नका. पण, त्या पोलिसांनी त्या नेत्याचे काहीच ऐकून घेतले नाही. उलट हातांनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हातांवर सुद्धा प्रहार केले. दिव्य मराठीच्या प्रतिनिधींनी या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि खरी माहिती समोर आणली.

नेमके काय घडले?
व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे त्याचे नाव शिवराज नारियलवाले असे आहे. शिवराज नारियलवाले हे जालना जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. स्थानिकांचे मुद्दे प्रशासनाकडे ते नेहमीच मांडत आले. ही घटना 9 एप्रिल 2021 ची आहे. याच दिवशी शिवराज यांना एका खासगी रुग्णालयामध्ये एका युवकाचे उपचार सुरू असताना निधन झाल्याची माहिती मिळाली होती. त्या युवकाला अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचाच जाब विचारण्यासाठी मृतकाचे नातेवाइक, शिवराज नारियलवाले आणि काही कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले होते.

रुग्णालयात वाद झाला, पोलिसांना बोलावले
मृतकाचे नातेवाइक संतप्त होते. त्यांनी रुग्णालयावर दुर्लक्षाचे आरोप केले. 9 एप्रिल रोजी मृतकाचे नातेवाइक आणि शिवराज नारियलवाले यांनी रुग्णालय प्रशासनाला मृत्यूबद्दल जाब विचारला. याच दरम्यान नातेवाइक, नारियलवाले आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहता रुग्णालय प्रशासनाने कदीम जालना येथील पोलिसांना फोन करून रुग्णालयात बोलावले.

घनटेची माहिती मिळाल्यानंतर तत्कालीन पोलिस उपाधीक्षक सुधीर खिरडकर आणि कदीम जालना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले. सुरुवातीला पोलिसांनी नातेवाइकांनी समजावून पाठवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाद वाढला आणि शिवीगाळ सुरू झाली. नातेवाइकांचा आरोप होता, की पोलिसांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्याचा व्हिडिओ काढण्याचा नारियलवाले यांनी प्रयत्न केला. हे एका पोलिस कर्मचाऱ्याने पाहून त्यांच्या साहेबांना सांगितले. त्यानंतर पोलिस उपाधीक्षक सुधीर खिरडकर आणि कदीम जालना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी त्या समूहातून नारियलवाले यांना ओढून एका खोलीत नेले. रुग्णालयातच असलेल्या त्या खोलीत नेताच काय घडले हे जालन्यासह समस्त नागरिक आज पाहत आहेत. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यातील डीवायएसपी सुधीर खिरडकर लाचखोरीच्या गंभीर प्रकरणात आधीच अडकले आहेत.

काय म्हणाले शिवराज नारियलवाले?
दिव्य मराठीच्या प्रतिनिधींनी शिवराज नारियलवाले यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी व्हिडिओतील व्यक्ती आपणच असून घडलेल्या घटनेची पुष्टी केली. "9 एप्रिल 2021 मला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यावेळी मारहाण करणारे सामान्य पोलिस कर्मचारी नसून पोलिस उपाधीक्षक आणि पोलिस निरीक्षक दर्जाचे होते. एवढे मोठे अधिकारी आपल्याला मारहाण करत असल्याचे पाहून मला काहीच करता आले नाही."

नारियलवाले पुढे म्हणाले, "लोक मला विचारतात की तुम्ही तेव्हाच कारवाईची मागणी किंवा तक्रार का केली नाही? प्रत्यक्षात मी घाबरलो होतो. शारीरिक दुखापत तर झालीच, त्यापेक्षा मला मोठा मानसिक धक्का बसला होता. पण, आता त्या मानसिक तणावातून बाहेर पडलो. व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासून मला अनेकांचे फोन येत आहेत. काहींनी सहानुभूती दाखवली. तर काहींनी मला प्रकरण चर्चेतून मिटवून टाकण्याचे सल्ले दिले. परंतु, मी आता शांत बसणार नाही. मला अमानुष मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात मी 307 चा गुन्हा दाखल करणार आहे." असेही त्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...