आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची दंडेलशाही:मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा राग, दोन अधिकाऱ्यांसह 8 पोलिसांनी मारले; नऊ एप्रिलला मारहाण; गुरुवारी व्हिडिओ झाला व्हायरल

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्या समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप शिवराज करत आहेत.

लाचखाेरीच्या प्रकरणांमुळे अाधीच बदनाम झालेल्या जालन्यातील पाेलिसांचे दंडेलशाहीचे अाणखी एक प्रकरण व्हायरल व्हिडिअाेच्या माध्यमातून समाेर अाले. लाचेच्या जाळ्यात अडकलेले तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर, पाेलिस निरीक्षक प्रशांत महाजन, डीवायएसपींचा बाँडीगार्ड सुमीत सोळुंके, कदीम ठाण्याचे चालक भारसाखळे, हाेमगार्ड पठाण, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे आदींसह ७ ते ८ पोलिस भाजप युवा माेर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवालेला काठी तुटेपर्यंत बेदम मारताना या व्हिडिअाेत दिसत अाहेत. हात जाेडून माफी मागत असतानाही अमानुष पद्धतीने मारहाण हाेत असल्याचे यात दिसते. घटना ९ एप्रिलची असून त्याचे व्हिडिओ अाता साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

...तर अनर्थ झाला असता
खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये संतप्त नातेवाइकांनी तोडफोड सुरू केली होती. तेथे आणखी काही रुग्ण आयसीयूत होते. त्या वेळी आम्ही तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी थोडा बळाचा वापर करावा लागला. तसे केले नसते तर इतर रुग्णांना धोका निर्माण झाला असता. शिवराज हेदेखील गोंधळ करणाऱ्यांपैकीच एक होते. - प्रशांत महाजन, पोलिस निरीक्षक

चित्रीकरण केले म्हणून मारहाण
रुग्णालयाच्या तोडफोडीशी माझा काहीही संबंध नाही. मी तेव्हा माझ्या बहिणीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तेथे गेलो होतो. खिरडकर आमच्या समाजाबद्दल अपशब्द वापरत होते. मी त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करत होतो. त्यामुळे मारहाण झाली. घटना ९ एप्रिलला घडली. तेव्हापासून मी प्रचंड तणावात असल्याने बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हताे. - शिवराज नारियलवाले, मारहाण झालेला युवक.

चौकशीनंतर कारवाई
मारहाणी विषयी कुणीही तक्रार दिली नाही. तरी सर्व प्रकरणाची मी चौकशी करणार आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल. तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर हेसुद्धा मारहाण करताना दिसत आहेत. चौकशीत दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. मारहाण करणारे अन्य कोण आहेत त्यांचीही नावे आम्ही निष्पन्न करतो आहोत. - विनायक देशमुख, पोलिस अधीक्षक

रुग्णालयातील गोंधळप्रकरणी चौघांवर गुन्हा
संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची काच फोडली. तसेच फायर एक्स्टिंग्विशर काढून फेकले, अशी तक्रार संबंधित रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने कदीम जालना पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात तीन-चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण
९ एप्रिल २०२१ रोजी जालना शहरातील एक युवक अपघातात जखमी झाला होता. त्या युवकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. याचा जाब विचारत नातेवाईक संतप्त झाले हाेते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. तत्कालीन डीवायएसपी खिरडकर, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन तेथे आले होते. नातेवाइकांना समजावून सांगताना एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्या समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप शिवराज करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...