आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टील, बी-बियाण्यांबरोबरच मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून जालन्याची सर्वत्र ओळख आहे. यातच ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचीही नुकतीच घोषणा झाली. त्यामुळे शासनाच्या या योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्यातून अधिक निर्यातदार निर्माण होऊन जिल्हा निर्यातीचा हब व्हावा, असा सूर गुंतवणूक वृद्धी व्यवसाय सुलभीकरण निर्माण प्रचलन व ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत उमटला.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने शुक्रवारी आयटीसी महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उद्योजक सुनील रायठठ्ठा, विदेश व्यापार महानिदेशालयाचे अधिकारी कृष्णदास नायर, पुणे येथील उद्योजिका सुषमा कोळवणकर, आयसीटीचे संचालक यू. एस. अन्नपुरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, जग ही मोठी बाजारपेठ आहे. जगाच्या बाजारपेठेची माहिती जाणून घेऊन कमी दरात मिळणारा कच्चा माल आयात करून त्यापासून पक्का माल तयार करून तो निर्यात केल्यास त्यापासून अधिक नफा मिळण्याबरोबरच देशाला परकीय चलन चांगल्या प्रमाणात मिळू शकते.
प्रत्येक गावातील शेतकरी, शहरांमधील उद्योजक, ट्रेडर्स यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून निर्यातीबाबत माहिती घेऊन ती सर्वदूर पोहोचवावी. सर्वांच्या प्रयत्नातून जालना जिल्हा हा निर्यातीचा हब व्हावा यादृष्टीने सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. राठोड यांनी या वेळी केले.
कृष्णदास नायर यांनी विदेश व्यापार महानिदेशालयामार्फत संपूर्ण देशभरात निर्यातीला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून उद्योजकांनी त्यांच्या अडचणी महानिदेशालायापर्यंत पोहोचवाव्यात. उद्योजकांच्या अडचणी केंद्र शासनापर्यंत पोहोचवून निर्यात धोरणात आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्योजक रायठठ्ठा यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात संधी, पुणे येथील निर्यात सल्लागार सुषमा कोळवणकर यांनी निर्यात प्रक्रिया व दस्तऐवजीकरण, नियम, प्रोत्साहन आणि निर्यात सुलभ प्रक्रिया या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाव्यवस्थापक करुणा खरात यांनी प्रास्ताविक केले.
लघुउद्योगात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
लघुउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वर्ष २०२१ चा प्रथम पुरस्कार मे. जलाराम ज्यूट इंडस्ट्रीजच्या दीपा दीपक शेळके यांना मिळाला. त्यांना रोख १५ हजार व मानचिन्ह दिले, तर द्वितीय पुरस्कार ओझा पापड उद्योगाच्या पद्माबाई जितेंद्र ओझा यांना दिला. त्यांनाही रोख १० हजार व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.