आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतात पडणारे पाणी ज्या खोलगट भागात थांबते त्या ठिकाणी ४ बाय ४ आणि ६ फूट खोलीचा खड्डा खोदून त्यात दगड, वाळू भरून तो बुजवून टाकला जातो. अशा प्रकारचे २० हजार खड्डे (जलतारे) दोन वर्षांत ५० गावांत जलतारा प्रकल्पांतर्गत मोफत खोदून देण्यात आली आहेत. यामुळे पावसाचे पाणी जमिनीतच मुरले असून त्या क्षेत्रातील विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.
यामुळे कोरडवाहू शेतीत गहू, हरभऱ्याचे पीक घेता आले आहे. अशा प्रकारचे तब्बल २४५ गावांत जलतारे निर्माण करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (२ जानेवारी) श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते केला जाणार आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये पाणी वाहत असताना एका कोपऱ्याला येऊन थांबते. त्या कोपऱ्याला आपण चार फूट रुंद चार फूट लांब व सहा फूट खोलीचा एक खड्डा करतो. ज्यामध्ये शेतकऱ्यांनी दगड भरून तो खड्डा बुजवून टाकावा लागतो.
एका एकरामध्ये आलेले सर्व पाणी त्या खड्ड्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीचा भूगर्भामध्ये जाते. असे प्रत्येक शेतकऱ्याने एक एकरमध्ये प्रत्येकी एक खड्डा असे गावभर जेवढे शिवार आहे त्यानुसार खड्डे निर्माण केले जातात. जेसीबी मशीनद्वारे हे खड्डे खोदले जातात. शेतकऱ्यांना केवळ त्यामध्ये दगडे भरावे लागतात. असे हजारो जलताराचे शोषखड्डे गावच्या शिवारात करणे हा प्रकल्प आहे. चार महिने पावसाळ्यात पडलेला पाऊस गावाचे शिवार सोडून बाहेर जात नाही. तो शिवारामध्येच थांबतो व शिवारामध्येच मुरून प्रचंड पाणीपातळी वाढते.
यामुळे मागील दोन वर्षांत झालेल्या ५० पैकी ३७ गावांमध्ये मोठा परिणाम झाल्याचे शेतकरी अनुभवत आहेत. २५ वर्षांपासून कोरडवाहू असलेली शेती पाण्याची पातळी वाढल्यामुळे बागायती बनली असून दोन पिकावरून शेतकरी तीन पिकांवर गेले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई संपली व शेतीला बारमाही पाणी उपलब्ध झाले. त्यातून पिकांची संख्या वाढून आर्थिक समृद्धता निर्माण झाली आहे. यामुळे जालना, परतूर आणि मंठा या तालुक्यात प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
अशी राबवली जाते प्रक्रिया
हा संपूर्ण प्रकल्प सहा महिन्यांमध्ये पूर्ण केला जातो. चार महिन्यांमध्ये गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचा सर्व्हे करणे, जिओ टॅगिंग करणे, जमिनीचा उतार काढणे, पाणीपातळी प्रत्येक महिन्याला मोजणे, पीक परिस्थितीची पाहणी करणे. सोबत जलताराचे प्रबोधन करणे आणि १ एप्रिलपासून १५ जूनपर्यंत जेसीबी मशीनच्या साह्याने संस्थेच्या वतीने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एका एकर क्षेत्रात एक खड्डा तयार करून दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना दगड टाकावे लागतात.
मागील प्रयोग यशस्वी, आता नवा मार्ग
शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची उपलब्धी व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात सुरुवातीला ५० गावांची निवड करण्यात आली. जमिनीचा तसेच पावसाचे पडणारे पाणी याचा सहा महिने अभ्यास केला. त्यानंतर त्या गावांत खड्डे (जलतारे) खोदून त्यापासून मिळणारे फायदेही अनुभवले. यामुळे आता २४५ गावांचे लक्ष्य हाती घेण्यात आले आहे. -डॉ. पुरुषोत्तम वायाळ, जलतारा प्रकल्प समन्वयक
वाटूर फाटा येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रम
जिल्हातील २४५ गावांत जलतारे निर्माण करण्याच्या उपक्रमाचाशुभारंभ गुरुवारी(२ जानेवारी)श्री. श्री.रविशंकर यांच्याहस्ते परतूरतालुक्यातील वाटूर फाटा येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावाही याठिकाणी आयोजित केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.