आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही:जांबसमर्थ 20 दिवस अंधारात; 5 दिवसांपूर्वी दिलेले 12 सीसीटीव्ही अजूनही नाही बसवले

लहू गाढे| जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटनस्थळाचा ब दर्जा असलेले जांबसमर्थ सध्या चांगलेच चर्चेत आहे. गावाच्या मधोमध असलेल्या समर्थ रामदास स्वामी मंदिराशेजारील श्रीराम मंदिरातून मूर्ती चोरीस गेल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तपास लागत नसल्यामुळे पोलिसांवर सर्वांकडूनच ताशेरे ओढले जात आहेत. परंतु, दुसरीकडे चोरी होण्याच्या पंधरा दिवस अगोदरपासून ट्रान्सफाॅर्मर जळाल्यामुळे हे गाव अंधारात होते. चाेरीनंतर पाच दिवसांनी ट्रान्सफाॅर्मर बसवले. ग्रामस्थांनी एक लाख रुपये गोळा करून ट्रान्सफाॅर्मर आणून पथदिवे सुरू केले. आजही बहुतांश भागात पथदिवे बंद असतात. दरम्यान, चोरीची घटना झाल्यानंतर एका नोकरदाराने पाच दिवसांपूर्वी या मंदिरासाठी १२ सीसीटीव्ही दिले. परंतु, ते अजूनही लागले नाहीत.

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ या गावात जवळपास ४२० कुटुंबे राहतात. चोरी झालेले मंदिर हे गावाच्या मधोमध आहे. स्वामी रामदास यांच्या पूर्वजांच्या जांबसमर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणाचा दहा दिवसांनंतरही छडा लागलेला नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा व राज्य सरकारच्या तांत्रिक तपास यंत्रणा चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावत आहेत. निश्चितपणे चोरट्यांचा माग काढण्यात येईल, अशी माहिती तपास अधिकारी सुभाष भुजंग यांनी दिली.

या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सर्व पथके विविध मार्गांनी तपास करीत आहेत. परंतु, घटनास्थळाहून काहीच धागा मिळत नसल्यामुळे हा तपास अवघड होत चालला आहे. मूर्तीचोरीतील तपासाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरातील विमानतळ, बंदरे यांच्यासह सर्व यंत्रणेला दक्ष करण्यात आले आहे. दरम्यान, मंदिराचे पुजारी असलेल्यांचे चार वेळा पोलिसांनी जबाब घेतले आहेत. यातून काही धागा मिळतो का, हे तपासले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी तपासकामाचा घेतला आढावा
जिल्हाधिकारी विजय राठोड, एसपी अक्षय शिंदे यांनी जांबसमर्थ येथील मंदिराच्या घटनास्थळी पाहणी केली. आरोपींना तत्काळ अटक करावी, असे आदेश राठोड यांनी दिले. जांबसमर्थ येथील चोरीबाबत अजून काय यंत्रणा तपासकामी लावता येईल या अनुषंगाने घनसावंगी ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याशीही चर्चा केली. तपासासाठी वेगवेगळी पथके आहेत, परंतु स्थानिक पातळीवरून या चोरीचा काही माग मिळतो का या अनुषंगाने ग्रामस्थ व पुजारी यांच्याशीही एसपी अक्षय शिंदे यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी राठोड यांनी तपासकामाबाबत आढावा घेतला. या ठिकाणी पुन्हा चोऱ्या होणार नाही या अनुषंगाने काय उपाययोजना करता येतील यावरही मंदिराच्या ट्रस्टशी चर्चा केली.

सर्व दिशांनी तपास
राज्यातील ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या मूर्ती चोरीच्या घटना घडल्या आहेत, अशा ठिकाणच्या तपासाच्या पूर्ण शक्यता लक्षात घेऊन राज्यभरात शोध घेणे सुरू आहे. तसेच जांबसमर्थ येथील मूर्ती चोरीचा सर्व दिशांनी तपास सुरू आहे.-सुभाष भुजंग, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.

वीज कंपनीचे दुर्लक्ष
गावातील ट्रान्सफाॅर्मर जळाल्यामुळे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे वीस दिवस गावात अंधार होता. चोरीच्या झालेल्या दिवशीही अंधारच होता. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे चोरी झाली. ३ दिवसांपूर्वी ट्रान्सफाॅर्मर दिल्याने गावात उजेड झाला. - बाळासाहेब तांगडे,सरपंच, जांबसमर्थ.

लोकप्रतिनिधी आले, तपासाचे आदेश देऊन गेले
जांबसमर्थ येथे चोरीची घटना झाल्यानंतर सत्ताधारी सरकारमधील तसेच विरोधी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी आले. त्यांनी पोलिसांना तत्काळ तपास लावा, असे आदेश देऊन निघून गेले. परंतु या गावातील रस्ते, बंद असलेले पथदिवे याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.

बातम्या आणखी आहेत...