आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:जायकवाडीच्या पाटबंधारे विभागाने मारले; परंतु वरुणराजाने तारले

तीर्थपुरी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाने ओढ दिल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद आदी खरीप पिके धोक्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणांतून हजारो क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडले. यातील काही क्युसेक पाणी पिकांसाठी डाव्या कालव्यातून सोडावे, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती. मात्र, जायकवाडीच्या पाटबंधारे विभागाने वेळीच याकडे लक्ष दिले नाही. शेवटी वरुणराजाने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या अनेक आठवड्यापासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे ऐन फुलात आलेले सोयाबीन व कापसासह इतर खरीप पिके धोक्यात आली होती. अंबड, घनसावंगी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरींची पाणीपातळीही वाढली नाही. मात्र, जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणांतून ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले.

पावसाने ओढ दिल्याने त्यातील काही पाणी जायकवाडीच्या डाव्या कालव्यामधून वितरिकेमार्फत उसासह खरीप पिकांना द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. मात्र, सुरुवातीला सर्व राजकीय नेत्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. जास्त ओरड झाल्याने मग वेगवेगळ्या पक्षातील पुढाऱ्यांनीदेखील कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी करून आपण शेतकऱ्यांप्रति किती दक्ष आहोत हे दाखवू दिले. त्यानंतर पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्याला ७०० क्युसेक याप्रमाणे पाणी सोडले. या सोडलेल्या पाण्याचा फायदा घेण्याअगोदरच चार दिवसांपासून अंबड, घनसावंगी तालुक्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, कापूस या खरीप पिकाला जीवदान मिळाले.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने ज्या दिवसापासून ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी नदीत सोडले तेव्हापासूनच पाणी डाव्या कालव्याला सोडायला पाहिजे होते. हे सोडलेले पाणी वितरिकामार्फत ओढे-नाल्यांना सोडून गावतळी व छोटे छोटे बंधारे भरून घेता आले असते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष तर झालेच, मात्र राजकीय नेतेही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा स्थानिक शेतकऱ्यांमधून आरोप होत आहे.

नसता उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवेल
यापुढे समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पाणी पातळी वाढणार नाही. त्यातही जर ओढे-नाले आणि चाऱ्या वाहिल्या नाही, तर पाणी विहिरींच्या तळाशीच राहील. असे झाले तर रब्बी पिकेही धड येणार नाहीत. तसेच उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे आताच पाणी असतांना त्याचा फायदा घेऊन ओव्हरफ्लोचे वाया जाणाऱ्या पाण्याचा विनियोग घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...