आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांत कार्यरत महिलांनी समाचार घेतला. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जिजाऊ, सावित्रींच्या लेकींचा सरकारमधील जबाबदार व्यक्तीकडून असा अवमान करणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे.
अत्यंत दुर्दैवी विधान
फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने जिजाऊ, सावित्रींच्या लेकींचा अवमान दुर्दैवी आहे. सुप्रियाताई राष्ट्रवादीच्या असल्या तरी सर्वच महिलांसाठी त्या दिशादर्शक आहेत. एकीकडे संसदेने त्यांना “संसदरत्न’ पुरस्कार दिला. दुसरीकडे राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री अत्यंत खालच्या पातळीवर त्यांच्याबद्दल बोलतो. अशा मंत्र्याचा सरकारने राजीनामाच घेतला पाहिजे. - विमलताई आगलावे, काँग्रेस कार्यकर्त्या
कायदेशीर कारवाई व्हावी
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. सुप्रियाताई या खासदार आहेत. परंतु कोणत्याही महिलेबद्दल अशा पद्धतीने अपशब्द वापरणे योग्य नाही. अशा पद्धतीने अवमान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.- कल्याणीराणी देशमुख, स्त्री सक्षमा फाउंडेशन
वैचारिक भिकारपण सरकारमधील एक मंत्री सुषमा अंधारे यांचा अवमान करतो. दुसरा मंत्री सुप्रियाताईंचा अवमान करतो. त्यावरून या मंत्र्यांचा वैचारिक भिकारपणा दिसून येतो. यांच्या सरकारमध्ये एकही महिला मंत्री का नाही हे यावरून दिसून येते. हे लोक मंत्रिपदावरच काय पण राजकारणात आणि समाजातही राहायच्या लायकीचे नाहीत. मला वाटते, यांना कुणीतरी महिलांचा अवमान करण्यासाठीच किरायाने ठेवले. - अॕॅड. कल्पना त्रिभुवन, विधी सल्लागार
विकृत मानसिकता
मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य म्हणजे त्यांची विकृत मानसिकता दिसून येते. महिलांबाबत असे वक्तव्य करणाऱ्या सत्तार यांचा बोलविता धनी कोण आहे हे शोधले पाहिजे. सरकारने त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. गंगुबाई वानखेडे, माजी नगरसेवक, शिवसेना
निषेधार्ह वक्तव्य
मंत्री अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. या माध्यमातून महिलांच्या मानसिकतेचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु महाराष्ट्रातील महिलांनी वेळोवेळी कर्तृत्व सिद्ध केले आहे. जिजाऊंच्या लेकी अशा मानसिकतेला बळी पडणार नाहीत. परंतु,महिलांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे.- विभावरी ताकट, जिजाऊ ब्रिगेड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.