आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभावाचे कीर्तन ऐकून १६ वर्षांचा भिका प्रभावित झाला. मलाही तुझ्यासारखेच कीर्तन करायचे आहे, तू शिकवशील का, अशी भावाला गळ घातली. “तुझे ना शिक्षण झाले, ना तुला लिहिता-वाचता येत. तू कसे कीर्तन करणार?’ अशा शब्दांत भावाने फटकारले. ही गोष्ट भिकाला चांगलीच झोंबली. त्यानंतर भिकाने थेट बदनापूरचा महानुभाव आश्रम गाठून गुरूंकडून भगवद्गीता मुखोद्््गत करण्यास सुरुवात केली. वयाच्या १७ व्या वर्षी अक्षरओळख झाली. मग भिकाने मागे वळून पाहिलेच नाही. आज वयाच्या ७१ व्या वर्षी ३९ पुस्तके, हजारो प्रवचने करणारा हा भिका महंत बाभूळगावकर शास्त्री म्हणून देशभरात परिचित आहेत. महानुभाव व वारकरी संप्रदाय जोडण्याचे मोलाचे काम ते करत आहेत. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन राज्य शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर केला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
२०२०-२१ साठी प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना, २०२१-२२ चा स्वामी श्री गोविंददेव गिरी तर २०२२-२३ या वर्षाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार बाभूळगावकर शास्त्री यांना जाहीर झाला आहे.
महंत बाभूळगावकर शास्त्री यांचा जन्म बदनापूर तालुक्यातील मांजरगावचा. त्यांचे मोठे बंधू भानुदास महाराज हे वारकरी संप्रदायातील कीर्तनकार होते. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे कीर्तन ऐकून त्यांनी भावाकडे कीर्तन शिकण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र कोणतेच शिक्षण झालेले नसल्याने भावाने त्यांना “ कीर्तन करणे तुझे काम नाही, तू गुरेच सांभाळ’ अशा शब्दांत हेटाळणी केली. हे शब्द जिव्हारी लागल्याने त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी बदनापूर येथील महानुभाव आश्रम गाठला. तेथे त्यांचे आध्यात्मिक शिक्षण सुरू झाले. ते शिकत असतानाच त्यांनी अक्षरे गिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर संस्कृत विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. संस्कृत आणि मराठी भाषेत पारंगत होत असताना त्यांचे अखंड वाचन, चिंतन व मनन सुरू होते. पुढे त्यांनी गावोगाव फिरून प्रवचन करण्यास सुरुवात केली. प्रवचनात अध्यात्म सांगण्यासोबतच त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. सर्वधर्मसमभाव हा त्यांच्या चिंतनाचा प्रमुख विषय. त्यावरच पुढे त्यांनी लिखाण सुरू केले.
झोळी, कीर्तन चंद्रिका, लीळावैभवसह गुरुजींची विपुल साहित्य संपदा झोळी, कीर्तन चंद्रिका, लीळावैभव (ओवीबद्ध दोन भाग), महावाक्य, आनंदसागर, ओथंबा, गोत्रज, एक सूर्य एक प्रभा, देवमाणूस, मंत्रपूजा, प्रायश्चित्त, श्रीगोविंदप्रभू, सभाशास्त्र, अभंगचिंतनी, भिका म्हणे, कीर्तन सांगाती, कीर्तनगंगा, प्रसादसेवा, मार्गस्थ, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, नामाचे दहा ठाय, मार्गरूढी, विचारमालिका निरूपण, शांतिपाठ, वास्तुपाठ, झांजर, मार्गस्थ (आत्मचरित्र दोन भाग), वचनमाला ( तीन भाग), उद्धवगीता
२६ वर्षांपासून महाचिंतनी उपक्रम बाभूळगावकर शास्त्री गेल्या २६ वर्षांपासून महाचिंतनीचा उपक्रम आयोजित करतात. देशाच्या विविध भागात निवासी राहून ही चिंतनी घेतली जाते. विविध धर्मांतील धर्मगुरू मार्गदर्शन करण्यासाठी येतात. यात वारकरी व महानुभाव सांप्रदायाची मोठी उपस्थिती असते.
माहेरकडून सासरचा गौरव वारकरी संप्रदाय हे माझे माहेर आहे, तर महानुभाव सासर. दोन्ही संप्रदायातील दरी आता मिटली आहे. आज या टोकाने त्या टोकाचा सन्मान केला आहे. माहेरच्या लोकांनी सासरचा केलेला हा सन्मान आहे, असे मी समजतो. -बाभूळगावकर शास्त्री, महंत, महानुभाव संप्रदाय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.