आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिणगी पडली:केंद्रीय मंत्री दानवेंविरोधात खोतकर पिता-पुत्र आक्रमक; जालना, मुंबईत ठोकला शड्डू; युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी वाहतुकीसाठी खुला केला पूल

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुलाच्या दर्जाची तपासणी करण्याची युवासेनेने केली साबांकडे मागणी, शिवसेना-भाजपमधील वादाला फुटले तोंड

जुना आणि नवीन जालना शहराला जोडणाऱ्या लोखंडी पुलाच्या जागी नवा पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पुलावरून अद्याप वाहतूक सुरू करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जालनेकरांची गैरसोय लक्षात घेता युवा सेनेने अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वात बुधवारी या पुलावरील सर्व अडथळे दूर करून वाहतूक सुरू केली. जालन्यात केंद्रीय मंत्री दानवे यांच्या ड्रिम प्रोजेक्टमधील या कामात अभिमन्यू खोतकर यांनी अशा प्रकारे धडक मारली, तर दुसरीकडे दानवे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्याप्रकरणी ज्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे ते मागे घेण्यात यावे म्हणून खोतकर यांनी थेट गृहमंत्र्यांना साकडे घातले. त्यामुळे एकाच दिवशी खोतकर पिता-पुत्र यांनी केंद्रीय मंत्री दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकल्याचे चित्र होते. या प्रकारामुळे आता पुढील काळात दानवे-खोतकर यांच्यातील शीतयुद्ध अधिकच भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जालना शहरातील कुंडलिका नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन लोखंडी पुलाच्या जागेवर नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे काम सुरू असल्यामुळे पुलाशेजारी असलेल्या छोट्या पुलावरून वाहतूक सुरु होती. परंतु त्यामुळे वाहतूक कोंडी घडण्याचे प्रकार घडत होते, शिवाय जालनेकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. हीच बाब लक्षात घेत युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी बुधवारी या पुलावरून वाहतूक होऊ नये म्हणून टाकलेले अडथळे काढून टाकले. या वेळी अभिमन्यू खोतकर यांनी स्वत: जेसीबीचा ताबा घेऊन हे अडथळे हटवले.

या वेळी भीमशक्तीचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगातिवरे यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा समन्वयक अंकुश पाचफुले, शिवसेनेचे शहरप्रमुख आत्मानंद भक्त, विजय पवार, निखिल पगारे, संदीप नाईकवाडे, घनश्याम खाकीवाले, दिनेश भगत, अमोल ठाकूर, गणेश मोहिते, शेख जावेद, सय्यद सलमान, संतोष परळकर, दीपक वैद्य, रवी भुतेकर, अभिषेक वायाळ यांच्यासह युवा सेना, शिवसेना व भीमशक्तीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात होता.

उद्घाटन की निव्वळ देखावा?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील विकासकामांसाठी पाच पैशाचादेखील निधी हे लोक आणू शकले नाहीत. म्हणून उद्घाटनप्रिय संघटनांनी हा देखावा केला आहे. येथे असलेला लोखंडी पूल शंभर वर्षांपेक्षा जास्त जुना होता. केंद्रीय मंत्री दानवे यांनी पाठपुरावा करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या पुलासाठी १३ कोटी रुपये मंजूर करून आणले. या पुलाचे १० टक्के काम बाकी होते. मात्र तरी संघटनांनी त्याचे उद्घाटन केले. त्यामुळे भविष्यातील दुर्घटनेला हे आमंत्रण ठरू शकते. - राजेश राऊत, शहराध्यक्ष, भाजप

संविधान पूल नाव द्यावे
कंत्राटदार भास्कर दानवे यांनी जाणीवपूर्वक हा पूल खुला केला नव्हता. आता युवा सेनेच्या मदतीने आम्ही तो खुला केला आहे. या पुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. या पुलाला संविधान पूल असे नाव द्यावे, अशी मागणी आम्ही अगोदरच केली आहे. हे नाव देईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सुधाकर निकाळजे, मराठवाडा कार्याध्यक्ष, भीमशक्ती

पूल कुणाचीही जहागिरी नाही
या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन महिने झाले आहेत तरी तो वाहतुकीसाठी खुला केला नव्हता. त्यामुळेच आज आम्ही तो खुला केला आहे. नागरिकांची गैरसोय होत होती म्हणून हे पाऊल उचलावे लागले. या पुलाच्या कामासाठी निधी कुणी आणला हे सर्वांनाच माहीत आहे. सर्वसामान्य जनतेच्या पैशातून पूल उभा राहिला आहे. त्यामुळे तो कुणाची जहागिरी नाही. याच्या कामाच्या दर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असून त्याची दखल बांधकाम विभागाने घ्यावी. अभिमन्यू खोतकर, राज्य विस्तारक, युवा सेना

बातम्या आणखी आहेत...