आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘गेल्या ४० वर्षांपासून मी सच्चा शिवसैनिक आहे, परंतु सध्या मी आणि माझे कुटुंब ज्या परिस्थितीतून जात आहे ते मी पाहू शकत नाही. घरी आलो की मला चिंतेत असलेले कुटुंब दिसते. हीच गोष्ट मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. पत्रकार परिषदेत ही माहिती देताना खोतकरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या आठवडाभरापासून सुरू होती. खोतकर यांनी मात्र आपला निर्णय जालना येथे जाहीर करू, असे सुरुवातीपासूनच सांगितले होते. त्यानुसार ते शुक्रवारी सायंकाळी जालन्यात आले. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर केला. खोतकर यांच्याशी संबंधित रामनगर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याच कारणामुळे खोतकर काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पत्रकार परिषदेत खोतकर यांनी एकदाही ईडीचा उल्लेख केला नाही. इतर आमदार आणि नेते शिवसेनेेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली, परंतु खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याशी बोलून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. शनिवारी सकाळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. आपले कुटुंब सध्या ज्या अडचणीतून जाते आहे त्यातून काही निर्णय घ्यावे लागतील, असे खोतकर यांनी ठाकरे यांना कळवले. पत्रकार परिषदेस शिवसैनिक आणि खोतकर यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
मी ‘सहारा’ शोधला आहे : अर्जुन खोतकर म्हणाले, ‘जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच माझ्या मागे हे शुक्लकाष्ठ लागले. हा कारखाना तापडियांनी वर्ष २०१२ मध्ये ४२ कोटी रुपयांत विकत घेतला. त्यानंतर अजित सीड्सने माझ्या मध्यस्थीने तो ४४ कोटींत विकत घेतला. यातील ७५ टक्के रक्कम त्यांनी स्वतः दिली. त्यामुळे कारखाना त्यांच्या नावे झाला. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही कारखान्यात ७ कोटींची गुंतवणूक केली. यातील ५ कोटी रुपये देवगिरी बँकेकडून कर्ज घेतले, तर उर्वरित रक्कम कुटुंबातून उभी केली. यात कोणताही गैरव्यवहार नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या अडचणी वाढल्या. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने या अडचणीतून बाहेर पडेल की नाही हा प्रश्न नाही, परंतु मी सहारा शोधला आहे. माझा आजपासून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे.’
काहीच मागितले नाही : ‘विधान परिषद अथवा मंत्रिपद अशी कोणतीही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली नाही. मात्र, साखर कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवाय जालना शहरातील पाणी, रस्ते, पीआर कार्ड या समस्यांसाठी आणि जालना जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे’, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. डोळे पाणावले : ‘मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला आहे. मी एकाही शिवसैनिकाला माझ्यासोबत या असे म्हणालो नाही,’ असे सांगताना खोतकर यांचे डोळे पाणावले. “आता शिंदे गटात आलो असल्याने उपनेतेपदाचा राजीनामा द्यावाच लागेल, परंतु अद्याप राजीनामा दिलेला नाही, आता देईन,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
जालना लोकसभा मतदार संघावरील दावा कायम
‘केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्याशी दिलजमाई झाली असली तरी जालना लोकसभा मतदारसंघावरचा दावा मी सोडलेला नाही. दानवे यांनी मला चहाला बोलावले आणि मी चहा घ्यायला गेलो, याचा अर्थ मी लोकसभा निवडणूक लढायची नाही असा होत नाही. उलट दानवे यांनीच आता मला संधी द्यावी, अशी मागणी मी केली आहे,’
अर्जुन खोतकर, माजी मंत्री
२५ वर्षे मेहनत केलेली जमीन मी इतरांना कशी देईन? : दानवे
जालना लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत आजारी असल्याने मी एकही दिवस प्रचाराला जाऊ शकलो नाही तरीही जनतेने मला विक्रमी मतांनी विजयी केले. ज्या जमिनीत मी २५ वर्षे मेहनत घेत नांगरणी केली, जमीन सुपीक केली, तिला कुंपण घालून सुरक्षित केले अशी जमीन मी इतरांना कसायला कशी देईन?’
- रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.