आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्नी नेहमीच कोणाशी सतत फोनवर बोलतेय म्हणून ट्रॅक्टर चालकाला एक लाख रुपये देऊन अपघाताचा बनाव करून खून केल्याची कबुली संशयित गजानन आढाव याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कविता आढाव असे मृत महिलेचे नाव आहे. कुंभारीत ही घटना घडली होती. औरंगाबाद येथील वीज वितरण कंपनीत लिपिक असलेल्या गजानन आढाव याचे कविता या मुलीशी तिसरा विवाह झाला होता.
पत्नी कविता नेहमी कोणाशी तरी फोनवर बोलतेय, असा संशय गजानन आढाव याला आला. त्यामुळे कविता यांचा खून करण्याचा प्लॅन आखला. त्याने महिनाभर सुट्टी टाकून भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे २७ डिसेंबर रोजी खोली भाड्याने केली. त्यानंतर नातेवाईक असलेल्या संशयित योगेश मोरे (रा. नांजा) याच्याशी चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी अपघात घडून कविता यांचा खून करण्याचे ठरविले. खून करण्यासाठी गजाननने योगेशला एक लाख रूपये देण्याचे कबूल केले होते. योगेशने लगेच ट्रॅक्टरचा विमा देखील काढला. ठरल्याप्रमाणे ३१ डिसेंबर रोजी गजानन आढाव हा पत्नी कविता यांना नातेवाईकांकडे जाऊ असे म्हणून दुचाकीवर बसून घेऊन आला. परंतु, गजानन हा दुसऱ्याच रस्त्याने जात असल्याचे कवितांना लक्षात आले. त्यानंतर तिने नातेवाईकांना फोन लावला. त्याचवेळी ट्रॅक्टर घेऊन आलेल्या योगेशने दुचाकीला धडक दिली. त्यात कविता या खाली पडल्या.
त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर घातल्याची कबुली गजानन याने दिली आहे. कविता यांचा सुध्दा हा दुसरा विवाह होता. मात्र, त्यांच्यात अनेक दिवसांपासून वादावादी होत होती. या प्रकरणी मयताच्या भावाच्या तक्रारीवरून संशयित पती गजानन आढाव व ट्रॅक्टर चालक योगेश मोरे यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर सासू व इतरांविरुद्ध ४९८ चा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गजानन आढाव याला अटक केली होती. तर टॅक्टर चालक फरार होता. त्याला ६ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.