आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:कुंडलिका, सीना संवर्धनाला लोकसहभागाची साथ

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चला जाणूया नदीला अभियानाला लोकसहभागाची साथ मिळण्यासाठी जिल्ह्यातील कुंडलिका, सीना, जीवरेखा व दुधना नदी संवर्धनासाठी नदीपात्रालगतच्या गावात समिती गठित करण्यात येणार आहे. गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत विविध उपक्रम राबवले जाणार असून लोकसहभागातून नदीचे रुपडे पालटणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने चला जाणूया नदीला या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता समिती गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी जालना व भोकरदनचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांना दिले आहेत. गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीला सामोरे जावे लागत आहे.

परिणामी पूर आणि दुष्काळासारख्या समस्या वारंवार भेडसावत असून शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्या, जलाशयांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता, साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. तर जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.

१३ सदस्यांची असेल समिती : सरपंच हे समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतील तर उपसरपंच हे पदसिध्द सदस्य असतील. तसेच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये पुरुष १ व महिला १ असे २ सदस्य, प्रगतिशील शेतकरी (प्रवर्गात सर्वसाधारण-१, अनुसूचित जाती, अ.जमाती-१ विमुक्त जाती, भटक्या जमाती-१) २ सदस्य, महिला शेतकरी प्रवर्गात सर्वसाधारण -१, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती -१, विमुक्त जाती/भटक्या जमाती-१ याप्रमाणे ३ सदस्य, शेतकरी उत्पादक गट किंवा कंपनी प्रतिनिधी प्रवर्गात १ सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी १ सदस्य आणि कृषिपूरक व्यावसायिक शेतकरी २ सदस्य असे एकूण १३ कार्यकारी सदस्य असतील.

जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला अहवाल
अकार्यकारी सदस्यात कृषी सहायक हे पदसिध्द तांत्रिक सदस्य, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे सदस्य सचिव, समुह सहाय्यक हे सहसचिव, कृषी मित्र किंवा नदी समन्वयक हे विस्तार कार्यप्रेरक अशाप्रकारे प्रत्येकी एकाचा समावेश असणार आहे. याप्रमाणे प्रत्येक गावासाठी समिती गठित करण्यात यावी. या समितीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या उपक्रमाबाबत कामकाज करावयाचे आहे. याप्रमाणे समिती गठित करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...