आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे दुर्लक्ष:घाणेवाडी मधून लाखो लिटर पाणी वाया; बाष्पीभवन प्रकल्पही रखडला

लहू गाढे | जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षापूर्वी नाशिक येथील एजन्सीने सर्व्हे करुन घाणेवाडी प्रकल्पाच्या दुरुस्तीचा अहवाल नगर पालिकेला देऊनही दुरुस्ती झाली नाही. आता या प्रकल्पाचा सांडवाच फुटला असून दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. शिवाय पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी तलावाच्या कडेला दीड लाख बांबूची झाडे लावण्याची ५१ कोटींची याेजनाही प्रशासकीय मान्यतेअभावी रखडली आहे. या सांडव्याची दुरुस्ती न झाल्यास उन्हाळ्याअगोदरच तलाव रिकामा हाेऊन पाणी-बाणी’होण्याची स्थिती आहे.

निजामाच्या काळात ९० वर्षापूर्वी घाणेवाडी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्प बांधताना उथळ जमीन परिसर पाहून बांधण्यात आला आहे. येथून स्वयंचलित यंत्रणेद्वारे नवीन जालना भागाला पाण्याचा पुरवठा केल्या जातो. या प्रकल्पाची दुरुस्ती न झाल्यामुळे सांडव्यासह भिंतीचे अवस्था बिकट आहे. चालू वर्षात हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

परंतू, सांडव्याखाली पडलेल्या छिद्रामुळे लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. प्रकल्प भरलेला असल्यास जालनेकरांना आठ दिवसाआड का होईना पाणी मिळते. परंतू, या तलावात पाणी नसल्यास टंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान पालिकेने पुणे येथील मार्क सिव्हील टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून माता रमाई सिंचन मुल्य वर्धन प्रकल्पांतर्गत घाणेवाडी तलावातील पाण्याचे नैसर्गिकरित्या बाष्पीभवन रोखण्यासाठी याेजना हाती घेतली असून जवळपास ५१ कोटींचा खर्च लागणार आहे. परंतू, यासाठी सरकार स्थिर नसल्यामुळे प्रशासकीय मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत हा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाया जात असल्यामुळे सुरेख खंडाळे, बाबासाहेब चंद आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. घाणेवाडी तलावातून अत्यंत कमी खर्चात पाणी मिळूनही या तलावाच्या देखभाल, दुरुस्ती कडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरवर्षी १.७५ दलघमी पाण्याचे हाेते बाष्पीभवन
घाणेवाडी (संत गाडगेबाबा जलाशय) प्रकल्पाची मुळ साठवण क्षमता १४ दलघमी होती परंतू, १९७८ मध्ये काही कारणास्तव सांडवा तोडल्याने ही साठवण क्षमता १० दलघमी झाली. यात जवळपास ३ ते ३.५० दलघमी गाळ आहे. दरवर्षी १.७५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. सुमारे ४५० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प व्यापलेला आहे.

तर बुडीत क्षेत्रातील १०० एकर जमीन उपलब्ध हाेणार
तलावातील गाळ काढून प्रकल्पाची खोली वाढवली जाणार आहे. तलावातून निघणारी माती भराव म्हणून वापरुन पाणी पातळीवरील कंटूर लाईन निवडून तेथे टाकला जाणार आहे. प्रकल्पाची खोली वाढणार असल्याने परिसरातील बुडीत क्षेत्रातील जवळपास ते ८० ते १०० एकर जमीन पुनर्वापरासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या तलावाच्या कडेने चारही बाजूंनी दीड लाख बांबूची झाडे लावून बाष्पीभवन रोखले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...