आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजा, तू चुकतोय, असे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांना आहे. कारण राजाच्या चुकीमुळे नुकसान राजाचे नव्हे, तर राज्याचे होणार आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांना खडसावण्याचे काम साहित्यिकांनी कोणतीही भीडभाड न बाळगता केले पाहिजे. साहित्यिकांनी देश आणि देशाच्या दशेवर केवळ परिसंवाद न घेता रस्त्यावरही उतरावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते शनिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक शेषराव मोहिते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार, स्वागताध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी चोथे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल देसाई, अनिल परब, विनोद घोसाळकर, खासदार बंडू जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर अंबेकर, ऋषिकेश कांबळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर पदाधिकाऱ्यांचे शिवाजी चोथे, संभाजी चोथे, विनायक चोथे यांनी स्वागत केले.
ठाकरे म्हणाले की, आपल्या देशात अजूनही लोकशाही रुजली की नाही याचा विचार व्हायला हवा. कारण आज आपण ज्यांना मते देतो त्यांची किंमत खोक्यात नव्हे, तर भावनेत व्हायला हवी. आज खरे तर गुप्त मतदान आहे. आपण काेणाला मत दिले हे इतरांना समजू नये म्हणून ही पद्धत आहे. पण, आज मतदारांनाही आपले मत कुठे जाते हे कळेनासे झाले आहे. त्यांची मते सुरतहून आसाम, गुवाहाटी, नंतर गोवा अशी फिरत आहेत. आपण एखाद्याला मत देतो. मात्र, नंतर त्या उमेदवाराच्या घरी खोका पाठवून त्याला खोक्यात बसवून इतरत्र नेले जाते आणि आपण बोंबलत बसतो. अशी व्यवस्था आपल्याला हवी आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
या वेळी माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे शेषराव मोहिते यांच्याकडे सुपूर्द केली. मसापचे कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगी येथे होत असून आतापर्यंत पाच संमेलने जालना जिल्ह्यात झालेली आहेत.
तुरुंगात जाण्याची भीती नसावी सत्तेविरोधात बोलले तर तुरुंगात जाण्याची भीती साहित्यिकांना नसावी. जेव्हा जेव्हा समाजावर नैराश्याचे ढग येतील तेव्हा तेव्हा आशेचे स्वप्न दाखवण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.