आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात नुकत्याच ३२ गावांत सरपंचांना थेट जनतेतून निवडल्यानंतर आता उपसरपंचांच्या निवडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. विशेष म्हणजे उपसरपंचाच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचाला मत देण्याचा अधिकार आहे. शिवाय उपसरपंचाची निवड करताना दोन उमेदवारांना समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकारही सरपंचाला देण्यात आला आहे. याविषयी ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अवगत केल्याची माहिती तहसीलदार सारिका कदम यांनी दिली.
दरम्यान,उपसरपंचपद आपल्याला मिळावे यासाठी अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी लॉबिंग सुरू केली आहे. भोकरदन तालुक्यातील एकूण ३२ ग्रामपंचायतींपैकी प्रथम ११ ग्रा.पं. मध्ये कठोरा जैनपूर, सावंगी आवघडराव, कोठाकोळी, जयदेवाडी, मनापूर, निंबोळा, लतीफपुर/फुलेनगर, तपोवन/तपोवन तांडा, खामखेडा, वालसा खालसा, जवखेडा बु. या गावात येत्या ४ जानेवारी २०२३ सकाळी १० वाजता तर उर्वरीत नांजा/क्षीरसागर करजगांव, पद्मावती, भिवपूर, ताडकळस, पळसखेडा दाभाडी, पिंपळगाव बारव/पळसखेडा ठोंबरे, वालसा डावरगाव, जवखेडा खु. या १० ग्रा.पं.ची ४ जानेवारी २०२३ दुपारी २ वाजता उपसरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. या शिवाय चोऱ्हाळा-मासनपूर, मोहळाई, शेलुद, वरुड बु., गोकुळ, वडशेद, पिंप्री, राजूर, देहेड, गव्हाण संगमेश्वर, एकेफळ या ग्रामपंचायतमधील उपसरपंचांची निवडणूक ५ जानेवारी रोजी होणार आहे. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली या ग्रामपंचायतींची पहिली सभा घेतली जाऊन त्यात उपसरपंचाची निवड होणार आहे. त्यासाठी एकूण १५ प्राधिकृत अधिकाऱ्यांची नावेही भोकरदनच्या तहसीलदार डॉ. सारिका कदम यांनी निश्चित केली आहेत.
या वर्षी सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्यात आली. त्यामुळे अनेक गावांमध्ये सरपंच एका पॅनलचा तर दुसऱ्या पॅनलला बहुमत मिळाले. त्यामुळे आता उपसरपंचपदासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींचे कारभारी निवडल्या गेले. कुठे पॅनलला बहुमताचा कौल तर कुठे सरपंच आले आणि सदस्य पराभूत झाले. कुठे बहुमताच्या आकड्यापासून पॅनल दूर अशी स्थिती आहे. आता तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींत उपसरपंच निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. किमान उपसरपंचपद आपल्याकडे राहावे, यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. गटातटातील हालचाली वाढल्या असून उपसरपंच निवड प्रक्रियेची प्रतीक्षा सुरू झाली आहे.
महिनाभरापासून सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने तापलेले वातावरण थंड होऊ लागले आहे. प्रत्येक पॅनलमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचे संख्याबळही सर्वांना ठाऊक झाले आहे. परंतु उपसरपंच कोण हे अद्यापही ठरलेले नाही. उपसरपंचपद आपल्याला मिळावे यासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केली आहे. उपसरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असल्याने गावपुढाऱ्यांची पुन्हा डोकेदुखी वाढलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.