आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथीचे आजार पशुपालकांमध्ये भीती:भोकरदन तालुक्यात जनावरे आढळली लम्पीबाधित; शेतकऱ्यांची चिंता वाढली

भोकरदन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यत: गाई व म्हशी या जनावरांमधील लम्पी या संसर्गजन्य आजाराचा शिरकाव भोकरदन तालुक्यात देखील झाला आहे. ह्या आजारावर मात करण्यासाठी संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यावर संपूर्ण लसीकरण हाच एकमेव उपाय असला तरी लसीचा तुटवडा मात्र सर्वत्र बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु वेळेस उपाययोजना केल्या तर या आजारावर मात करता येऊ शकते असे पशुसंवर्धन खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा व कर्नाटक, आंध्रप्रदेशातील काही भागात थैमान घालून लंपी हा भयंकर आजार महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. गाई व म्हशींमध्ये आढळला जाणारा लंपी स्कीन डिसीज नावाचा विषाणूजन्य आजार महाराष्ट्रात दाखल झाला आहे. विदेशी वंशाच्या आणि संकरित गाईंमध्ये देशी वंशाच्या गाईंपेक्षा या आजाराच्या बाधेचे प्रमाण अधिक आढळून येते. उष्ण व दमट हवामान आजाराचा प्रसार होण्यास अधिक पोषक असते या आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी आजारी जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते.

पर्यायाने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते.हा आजार माशा, डास, गोचीड तसेच बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यांच्यामार्फत होतो.भोकरदन तालुक्यातील वरुड या गावात ५ जनावरांची नमुने पॉझिटिव्ह आले. त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे व कामाला लागले असून त्या बाधीत जनावरांवर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना डॉ. विजय राठोड यांनी प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गिक रोग प्रतिबंधक नियंत्रण अधिनियमन २००९ नियम १२ नुसार प्राप्त अधिकारान्वये , संक्रमित झालेल्या जनावरांच्या केंद्रापासून ५ किमी बाधित क्षेत्र व १० किमी निगराणी क्षेत्र घोषित केले आहे. सदर गावापासून बाधित व निगराणी क्षेत्रांमधील मोठ्या जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार प्रदर्शन, शर्यती आयोजित करण्यात पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला. तहसीलदार सारिका कदम यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समिती देखील नेमण्यात आली आहे.

लम्पी आजाराची लक्षणे
या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथीना सूज येते. सुरुवातीस ताप येतो. दुधाचे प्रमाण कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, मायांग, कास इ. भागांच्या त्वचेवर १०-५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात. डोळ्यांची दृष्टी बाधित होते.

शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घेणे महत्त्वाचे : जंजाळे
१५ मिली कडूलिंबाचे व १५ मिली करंजाचे तेल, २० ग्रॅम अंग धुण्याचा साबनीचा तूकडा यांचे १ लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून जनावरांच्या अंगावर व गोठ्यात तीन दिवसांच्या अंतराने फवारावे. तसेच सकाळ, संध्याकाळी कडुलिंबाच्या पाल्याचा धूर गोठ्यांमध्ये करावा.
डॉ.डी.के.जंजाळ, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन तालुका लघु पशुसंवर्धन

बातम्या आणखी आहेत...