आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपळगाव रेणुकाई भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे महावितरणचा अफलातुन कारभार चव्हाट्यावर आला आहे. शेतात वीज जोडणी नसताना देखील येथील चार शेतकऱ्यांना तब्बल ७ हजार ४६४ रुपयाची बिल पाठवून महावितरणने नवीनच पराक्रम केला असल्याने शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. काही वर्षापूर्वी पिंपळगाव रेणुकाई येथे शासनाच्या वतीने एक शेतकरी एक डीपी ही योजना राबविण्यात आली होती. शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होऊन शेती विकासात वाढ व्हावी असा शासनाचा यामागचा उद्देश होता.
दरम्यान पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकऱ्यांनी देखील योजना फायद्याची असल्याने थ्री.एच.पी.चे कोटेशन भरुन सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणकडे प्रस्ताव सादर केले होते. यामध्ये संबंधित कंत्राटदाराने काही शेतकऱ्यांचे काम पूर्ण केले तर काही ठिकाणी केवळ पोल उभे करुन पळ काढला असल्याचे शेतकरी सांगत आहे. विशेष म्हणजे सदर योजनेत कोटेशन भरलेले शांताबाई शामराव नरवाडे, अशरफ खान बलदर खान पठाण, दादाराव गणपत जाधव, विजय खंडेराव देशमुख आदी शेतकऱ्यांना वीज जोडणी न करताच महावितरणने विज देयके पाठवले असल्याने शेतकऱ्यांना मोठा झटका बसला. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. बांधावर केवळ पोल उभे आहे. विद्युत वाहिन्या जोडल्या गेल्या नाही मग बिल आले कसे हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
सध्या शेतकरी सततच्या नैसर्गिक संकटामुळे हतबल झाले आहेत. यंदा खरीपात झालेल्या अतिवृष्टीत पिकांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे हातात काहीच लागले नाही. पेरणीसाठी घेतलेली उसनवारी कशी फेडावी या विवंचनेत शेतकरी असताना महावितरणकडून शेतकऱ्यांची अशाप्रकारे होत असलेली लुट पाहता शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वरिष्ठाकडे अर्ज देखील सादर केले आहे. माञ संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे शेतकरी सांगत आहे. महावितरण घरगुती ग्राहकांना देखील अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करुन विद्युत ग्राहकांची देखील फसवणूक करत असल्याच्या असंख्य तक्रारी आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नेहमीप्रमाणे नाटरिचेबल दिसुन आले.
अनेक तक्रारी केल्या मी थ्री एच. पीच्या कृषी पंपासाठी कोटेशन भरले होते. माञ शेतात केवळ पोल ऊभे करुन विद्युत वाहिन्या न जोडताच संबंधित कंत्राटदार फरार झाला आहे. वीज जोडणी नसताना हजारो रुपयाची बिल माझ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे. याबाबत वरिष्ठाकडे तक्रार अर्ज देखील सादर केले आहे. माञ वरिष्ठाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही किंवा दखल घेतली जात नसल्याने आता आम्ही न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न आहे. या प्रकरणी चौकशी होणे गरजेचे असल्याचे विजय देशमुख म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.