आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोपेंची माहिती:कोरोना बाधितांची संख्या कमी झाली ही समाधानाची बाब, चौथी लाट टाळायची असेल तर संपूर्ण लसीकरण आवश्यक - राजेश टोपे

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरासह राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ही आता ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. आता याविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी भाष्य केले आहे. कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली ही समाधानाची बाब आहे. असे असले तरी चौथी लाट टाळायची असेल तर संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच सर्वांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, 'नवीन केसेसची संख्या कमी झाली आहे ही सर्वात महत्वाची आणि समाधानाची बाब ही आहे. राज्यामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे. एकेकाळी तिसरी लाट एवढी मोठी होती की एकावेळी 48 हजार नवीन रुग्ण समोर येत होती. सक्रीय रुग्णसंख्या तर काही लाखांमध्ये होती. या सर्व पार्श्वभूमीवर समाधानाची बाब ही आहे की केसेस कमी झाल्यात आणि लसीकरणाचे प्रमाण खूप चांगलं आहे'.

संपूर्ण लसीकरण आवश्यक
तसेच पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांना मनापासून विनंती आहे की, त्यांनी पूर्ण लसीकरण करुन घ्यावे. जे बुस्टर डोससाठी पात्र आहेत, त्यांनी तो डोस घ्यावा. 15 ते 18 वयोगटातील लोकांनी देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच खऱ्या अर्थाने चौथी लाट येऊ द्यायची नसेल, सुरक्षित राहायचे असेल तर त्यांनी लसीकरण करुन घेणे काळाची गरज आहे.' असे टोपे म्हणाले.

निर्बंध हटवण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा
पुढे बोलताना टोपे म्हणाले की, 'कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी देखील अगदीच कमी झाले असे काहीही नाही. मात्र मार्च महिन्यात आता असलेले निर्बंध हटवण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. परिस्थिती पाहून लागू असलेले छोटे-मोठे असे सर्वच निर्बंध 100 टक्के हटवण्यात येऊ शकतात. निर्बंध हटवावे अशी मुख्यमंत्र्यांचीही इच्छा आहे असे देखील टोपे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...