आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लढा मराठा आरक्षणाचा:साष्टपिंपळगाववासीयांच्या काही मागण्या मान्य; 95 दिवसांनंतर ठिय्या आंदोलन मागे, मुख्यमंत्र्यांतर्फे पालकमंत्री राजेश टोपे यांनी पाठवले लेखी पत्र

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बारामतीकडे जाण्याची केली होती तयारी, पण पोलिसांनी रोखले

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे ९५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू होते. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. यात काही दिवसांमध्ये आंदाेलकांनी अन्नत्यागही केला होता. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची मध्यस्थी करीत काही मागण्या मंजूर केल्या तर काही मागण्या लॉकडाऊन संपल्यानंतर तत्काळ मंजूर करू, असे लेखी आश्वासन पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील तरुणांची होणारी परवड, गरजवंत कुटुंबीयांना स्कॉलरशिप नसल्यामुळे उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी यासह विविध समस्यांबाबत मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने अख्खं गावच राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला बसलं होतं. काही दिवसांमध्ये तर आंदोलकांनी अन्नत्यागही केला होता. या आंदोलनात इतिहासतज्ञ, शिवव्याख्याने, राष्ट्रीय स्तरावरिल शिवशाहीर, राज्यभरातील महंत मंडळी, राज्य समन्वयक, राज्यातील वकील संघ, विविध सामाजिक संघटना, रॅली, मराठा संघर्ष यात्रा, विविध राजकीय पक्ष, विविध शिक्षक संघ, गावची गावे हजारोंच्या संख्येने साष्टपिंपळगाव आंदोलन ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवित होते. या आंदोलनादरम्यान, सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. आंदोलन मागे घेण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी मध्यस्थी केली. राज्य सरकारच्या वतीने त्यांनी साष्टपिंपळगाव आंदोलकांना सातपैकी चार मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले. हे लेखी पत्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार विद्याचरण कडवकर, पीएसआय हनुमंत वारे यांनी साष्टपिंपळगावात आंदोलन ठिकाणी येऊन दिले आहे.

बारामतीकडे जाण्याची केली होती तयारी, पण पोलिसांनी रोखले
मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी बारामती येथे जाण्याची तयारी केली होती. परंतु, आदल्या दिवशीच पोलीसांनी त्यांना उचलून अटक करण्यात आली होती. या दिवशी गावातील महिला, युवतींनी चांगलाच गदारोळ केला होता. शासनाला आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला आरक्षण, स्कॉलरशिप, शिक्षणाची गरज नाही का, असा संतप्त सवालही उपस्थित केले होते. ग्रामस्थांनी शिक्षणावरही बहीष्कार टाकण्याचा मोठा निर्णयही घेतला होता.

आंदोलनासाठी माहेरी आल्या सासरच्या मुली
राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची धुरा महिलांकडे देण्यात आली होती. सात महिलांसह काही युवतींनी हे नेतृत्व सांभाळत तीन महिने अविरणतपणे आंदोलन चालू ठेवले. दरम्यान, समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रोश मेळावाही पार पडला आहे. या मेळाव्यासाठी या गावातील सासरी गेलेल्या मुलींही या गावात आक्रोश मेळाव्याला उपस्थित राहील्या होत्या. सामाजिक कार्यक्रमांनी हा आक्रोश मेळावा संपूर्ण राज्यासाठी लक्षणीय राहिला आहे. गावात आलेल्या या मुलींनी फेटे घालून मेळाव्यात सहभागी झाल्याने हे आंदोलन चांगलेच चर्चेत राहिले.

बातम्या आणखी आहेत...