आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल, पतीला अटक

तीर्थपुरी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडी घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन येण्यासाठी पतीकडून पत्नीचा छळ, पोटात लाकडी दांड्याने व लाथा मारल्याने आतडे फाटून विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना भार्डी (ता. अंबड) येथे घडली आहे. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

याविषयी मृत विवाहितेचा भाऊ अंबादास शरणागत (रा. तीर्थपुरी) याने गोंदी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २७ एप्रिल रोजी मी तीर्थपुरी गावात असताना माझ्या पत्नीच्या मोबाइलवर भाचा गौतम याने फोन करून सांगितले की, वडील आईला मारहाण करत असल्याचे सांगितले. मी चुलते यांना याची कल्पना देऊन आपल्याला भार्डी येथे जाऊन बहीण योगिता हिला आणायला जायचे असल्याचे सांगितले. भार्डीला जाण्याच्या तयारीत असताना माझ्या बहिणीचे पती सुरेश यांचा भाऊ विनोद यांचा फोन आला की, तुम्ही आताच येऊ नका, सुरेश हा भरपूर रागात आहे. मी तुमच्या बहिणीला तीर्थपुरी येथे आणून सोडतो.

यानंतर त्याने तीर्थपुरी येथे आणून सोडले. त्यानंतर बहीण योगिताने सांगितले की, माझे पती सुरेश हे आपले वडील रिटायर झाल्याने त्यांना भेटलेल्या पैशातून गाडी घेण्यासाठी २ लाख रुपये आणण्याच्या कारणावरून सतत मारहाण करत होते. मी पैसे आणण्यास नकार दिला असता त्यांनी लाकडी दांड्याने पोटावर, पाठीवर मारहाण केली. पोटावर पाय देऊन केस ओढून बेदम मारहाण केली. पोटात दुखत असून मला लवकर दवाखान्यात घेऊन चल, असे ती म्हणाली. त्यानंतर मी बहिणीला औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे एमआरआय स्कॅन केल्यावर समजले की, आतडे फाटलेले असून प्रकृती गंभीर असून ऑपरेशन करावे लागेल. त्यानंतर मी बहिणीला घाटीत दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना ३० एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात पती सुरेश भगवान वाहूळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली, असे तपास अधिकारी एपीआय दीपक लंके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...