आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लढवय्ये, ज्ञात-अज्ञात सेनानी, हुतात्म्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करत संपूर्ण मराठवाड्यात स्मृतिस्थळांची उभारणी व जतन, संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ७५ कोटींचा निधी खर्च होणार असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मराठवाड्यातील पालकमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यासंदर्भात बैठक झाली. यात वर्षभरात हाती घ्यावयाच्या विविध कामांचा आराखडा मंत्री देसाई यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारण्यात आला. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला, यात जिवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले, ते लढले, जिंकले अन् हुतात्मे झाले. याच लढवय्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यासाठी राज्य शासनाकडून अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत करावयाच्या विविध कामांचा आराखडा तयार केला जात आहे. जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी स्मृतिस्थळे उभारली जाणार आहेत.
पाच पालकमंत्र्यांची उपस्थिती
कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे, नांदेडचे अशोक चव्हाण, हिंगोलीच्या प्रा. वर्षा गायकवाड व लातूरचे अमित देशमुख यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
एेतिहासिक स्थळांचा विकास
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके, स्मृतिस्थळांचा विकास केला जाणार आहे. यासाठी साधारणत: १० कोटींचा आराखडा तयार करण्याच्या सूचना असून त्यानुसार आराखडा करत आहोत.
- डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.