आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टील, बियाणे, ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्ग अशा वैशिष्ट्यपूर्ण उपलब्धी लाभलेल्या जालन्यात दररोज दीड-दोन हजार ट्रक, टेम्पोतून मालवाहतूक होते. मात्र, या वाहनांना थांबण्यासाठी हक्काची जागा नाही, खासगी पार्किंगमध्येही दिवसाकाठी १०० ते २०० रुपये मोजावे लागतात. यामुळे चालक जागा मिळेल तिथे ट्रक उभे करत असून वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. यासंदर्भात शासन-प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली, पाठपुरावा केला.
मात्र, हा विषय मार्गी लागला नाही. एमआयडीसी फेज - ३ मध्ये पार्किंगसाठी भूखंड राखीव असल्याचा दावा केला जात आहे. मात्र यासंदर्भात प्रस्तावात त्रुटी आल्यामुळे फेरप्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे एमआयडीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. तब्बल दहा वर्षांपासून ट्रक टर्मिनसचे भिजत घोंगडे कायम असल्यामुळे चालक-वाहकांसह ट्रान्सपोर्टचालकही हतबल झाले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ट्रक टर्मिनस उभारणीचे सूतोवाच केले होते. मात्र, त्यांच्यानंतर हा विषय अडगळीत पडला. गतवर्षी ९ मार्च रोजी तत्कालीन उद्योग राज्यमंत्री तटकरे यांनी याबाबत एमआयडीसीच्या प्रादेशिक व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या होत्या.
यानुसार एमआयडीसी फेज -३ मध्ये ट्रक टर्मिनससाठी राखीव असलेल्या जागेत उपलब्ध करून द्यावयाच्या विविध सोयी-सुविधांचा एकत्रित प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र, यात त्रुटी निघाल्यामुळे प्रस्ताव परत आला. यातच गत जून महिन्यात राज्यात सत्तांतर घडले. यामुळे अनेक विषय मागे पडले. त्यात ट्रक टर्मिनसचाही समावेश होता. आता पुन्हा सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो वरिष्ठांकडे पाठवला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
सुधारित प्रस्ताव तयार करून पाठवणार
एमआयडीसी फेज ३ मध्ये ट्रक टर्मिनससाठी आरक्षित भूखंडावर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. मात्र, त्यात त्रुटीमुळे प्रस्ताव परत आला. आता सुधारित पाठवला जाणार असून याचे काम सुरू आहे. -एन. ए. जाधव, उपअभियंता, एमआयडीसी,जालना
रस्त्यावर वाहने उभी करू नये, अन्यथा कारवाई
रस्त्यांवर कुणीही वाहने उभे करू नये, जेणेकरून वाहतूकीची कोंडी टाळता येईल. प्रत्येकाला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. यामुळे प्रवाशी, मालवाहू वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्यावर उभी करू नये, रहदारी सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. नियम तोडल्यास कारवाई केली जाईल. - गुणाजी शिंदे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, जालना
सातत्याने पाठपुरावा तरी विषय मार्गी लागेना
दरराेज १५०० ते २००० ट्रक व छोट्या-मोठ्या मालवाहू वाहनांची ये-जा असते. खासगी पार्किंगमध्ये पैसे मोजावे लागतात. ट्रक टर्मिनस उभारावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून शासनाने याची दखल घ्यावी. -संजय राजगुरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
जीआर काढूनही उलटली तीन वर्षे
टर्मिनससाठी ४२ हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड आरक्षित आहे. शासनाने २०१९ मध्ये शासन निर्णय काढला होता. मात्र, तीन वर्षातही हा विषय मार्गी लागलेला नाही. एकीकडे उद्योग-व्यवसायातील वाढीबरोबरच मालवाहू वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, वाहन उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे खासगी पार्किंगमध्ये १०० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत. तर काहीजण रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत, कंपनी परिसरात वाहने उभी करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.