आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर भरण्याचे आवाहन:बदनापूर शहरातील 57 बड्या मंडळींकडे लाखो रुपयांचा थकलाय मालमत्ता कर!; 6 मेपर्यंत थकबाकी न भरल्यास प्रकरण लोकअदालतीत ठेवणार

बदनापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर मालमत्ता कर, नळपट्टी, स्वच्छता कर यामध्ये वाढ झालेली असून सामान्य नागरिकांना विशेष म्हणजे घरकुल मंजूर झालेल्या गोरगरिबांना मालमत्ता कर भरल्याशिवाय लाभ घेता आला नाही, मात्र शहरातील काही श्रीमंत मंडळींकडे लाखो रुपये मालमत्ता कर थांबलेला असताना त्यांची कामे मात्र अडत नाहीत. शहरातील ५७ लोकांकडे नगरपंचायतीची तब्बल २१ लाख रुपये थकबाकी असून ६ मेपर्यंत त्यांनी थकबाकी भरणे आवश्यक आहे, नसता ७ मे रोजी बदनापूर न्यायालयातील लोकअदालतीमध्ये सदर प्रकरणे ठेवली जाणार असून त्या लोकांनी ७ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस न्यायालयाने बजावल्याने खळबळ उडाली आहे.

बदनापूर शहरातील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झाले. त्यापूर्वी अनेकांनी ग्रामपंचायत मालमत्ता कर भरून टाकला तर अनेकांनी मात्र स्वच्छता, नळपट्टी, दिवाबत्ती, मालमत्ता कर भरलेच नाही. २०१६ मध्ये नगरपंचायतमार्फत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मोहीम राबवण्यात आली असता पुन्हा काही लोकांनी कर भरला. सदर करापोटी रक्कम वसुली झाल्यानंतर नगरपंचायत फंडात रक्कम जमा होते. त्या रकमेतून शहरातील विविध भागातील स्वच्छता, दिवाबत्ती आदींवर खर्च केला जातो. परंतु शहरातील काही श्रीमंत मंडळी नगरपंचायतींचा मालमत्ता कर भरत नसल्याचे समोर आले आहे. नगरपंचायतमधून कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र किंवा मालमत्तेचा नमुना ४७ घ्यावयाचा असेल तर प्रथम मालमत्ता कर बेबाकी घ्यावी लागते तेव्हाच नगरपंचायत विविध प्रमाणपत्र देते.

मात्र त्या लोकांना नगरपंचायतमधून लागणारे कोणतेही कागदपत्रे बेबाकी न पाहता दिले जात असल्यामुळे लाखो रुपये थकलेले असताना त्या लोकांनी मालमत्ता कर भरलेला नाही. विशेष म्हणजे गोरगरिबांना घरकुल मंजूर झाल्यानंतर नगरपंचायतींवर राज्य करणाऱ्या प्रतिनिधींनी घरकुल लाभार्थींना सर्वप्रथम मालमत्ता कर भरण्यास भाग पाडले.

नंतरच त्या लोकांना घरकुलचे अनुदान वर्ग करण्यात आले. गोरगरिबांकडे पैसे नसल्यामुळे अनेकांनी घरातील वस्तू विकून नगरपंचायतींचा मालमत्ता कर भरला तर काही गोरगरीब महिलांनी स्वतःजवळ मोजके असलेले अंगावरील डाग दागिने गहाण ठेवून नगरपंचायत कर भरला, तर दुसरीकडे श्रीमंत मंडळींची कामे मात्र बिनबोभाटपणे नगरपंचायतमधून झाली. बदनापूर नगरपंचायत फंडात सध्या झीरो पैसे असल्यामुळे शहराचा विकास पूर्णतः रखडला आहे, साधी पाइपलाइन दुरुस्तीला पैसे नसल्यामुळे दुकानदाराकडून उधार माल आणावा लागत असल्यामुळे दुकानदारदेखील १०० रुपयांची वस्तू २५० रुपयाला नगरपंचायतीला देत आहे.

एकंदरीत नगरपंचायत तिजोरीत पैसे नसल्यामुळे आणि थकबाकीदारांना वारंवार नोटीस बजावूनदेखील थकबाकीदार मालमत्ता कराची रक्कम जमा करीत नसल्यामुळे नगरपंचायत मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी शहरातील ५७ थकबाकीदार नागरिकांना २१ लाखांच्या वसुलीसाठी न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. सदर थकबाकीदारांना बदनापूर न्यायालयाने ६ मेपर्यंत थकबाकीपोटी असलेली मालमत्ता कराची रक्कम नगरपंचायतींमध्ये जमा करावी, नसता ७ मे रोजी न्यायालयात लोकअदालतीमध्ये हजर राहण्याचे फर्मान काढल्याने त्या थकबाकीदारांच्या तंबूत घबराट निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...