आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानीचे पंचनामे करा:आमदार बबनराव लोणीकरांच्या तहसीलदारांना सूचना;  सातोना शिवारामध्ये वादळाचा तडाखा; केळींचे फड भुईसपाट

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी रात्री तालुक्यातील सातोना शिवारात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीच्या फडांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी केळीची झाडे उन्मळून पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या सातोना बु. येथील शेतकऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत झालेल्या नुकसानाची माहिती दिली आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तत्काळ या बाबीची दखल घेत परतूरच्या तहसीलदारांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निम्न दुधना प्रकल्पाच्या लगत असणाऱ्या या परिसरात सर्वाधिक क्षेत्र ऊस या पिकाखाली आहे. ऊसाचे अतिरिक्त क्षेत्र वाढल्याने ऊसाच्या गाळपाचा गंभीर प्रश्न तालुक्यात निर्माण झाला होता.अतिरिक्त ऊसाच्या डोकेदुखी मुळे यंदा परिसरातील बहुतांश शेतकरी केळी पिकाकडे वळले आहेत. पाण्याची उपलब्धता आणि सुपीक जमीन या जमेच्या बाजू असल्याने देखील शेतकरी केळीकडे वळले आहेत. जोमात असलेली केळीची शेती अस्मानी संकटामुळे संकटात सापडली आहे. जवळपास २५ हेक्टर क्षेत्रावरील केळी फडांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अस्मानी संकटामुळे अर्थिक संकटात संपलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी पीडित शेतकरी करीत आहेत. अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेली केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी आस्मानी मध्ये पुरता हवालदिल झाला असून अशा परिस्थितीत सातोना बु शिवारातील नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी विठ्ठल बिडवे, नारायण बिडवे, बंडू मानवतकर, सुरेश मानवतकर, रमेश मानवतकर, सुदाम आकात, दत्ता जाधव, प्रभू लाटे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

उसाच्या नुकसानीतून सावरत असताना केळीमुळे पुन्हा संकटात वाढ

मागील चार वर्षापासून शेतकऱ्यांवर संकटांची मालीका सुरू आहे. एकामागे एक संकटे सुरूच आहेत. यातून सावरत असताना यंदा ऊसाच्या नुकसानीतुन सावरत नाहीत तोच केळीच्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. उत्पादन खर्च भरमसाठ वाढला आहे. अशात काल आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. सुरेश मानवतकर, शेतकरी राणी वाहेगाव

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा शासन स्तरावरून पंचनाम्याची मागणी

सातोना परिसरात शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा तोडी आलेला घास या नुकसानीमुळे हातून गेला आहे. सुरूवातीला ऊस अन आता केळीचे नुकसान झाले. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. बबनराव लोणीकर, आमदार परतूर

बातम्या आणखी आहेत...