आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन:मुलांच्या हातून मोबाइल काढून त्यांच्या हाती पुस्तक दिले पाहिजे

टेंभूर्णी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या हातून मोबाईल काढून त्यांच्या हाती पुस्तक दिले पाहिजे. पुस्तके जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देते, व्यक्तिमत्व घडविते, आपल्या मनातील आंतरिक प्रदूषण दूर करते. यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी गावागावात ग्रंथालय उभारणे गरजेचे असल्याचा सूर जिल्हा ग्रंथालय असोसिएशनच्या २५ व्या वार्षिक अधिवेशनात उमटला.

टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हा ग्रंथालय असोसिएशनच्या २५ व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा ग्रंथालय असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजशेखर बालेकर, उपाध्यक्ष देविदास देशपांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील, दिव्यांग कवी आकाश देशमुख, सरपंच गौतम म्हस्के, उपसरपंच संतोष पाचे, पीएसआय सतीश दिंडे, डॉ.अमोल वाघ, शंकर पवार, रामधन कळंबे, प्राचार्य भास्कर चेके, पी. जी. तांबेकर, कैलास बियाणी आदींची उपस्थिती होती. औरंगाबादचे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे म्हणाले की, समाज शास्त्रज्ञांचे ठाम मत आहे की वार्डा वाडा मध्ये ग्रंथालय झालीत तर पोलिस ठाण्यांची गरज भासणार नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील म्हणाले की, पुर्वीच्या काळी जर बाळ रडत असेल तर त्याला आई जवळ घेवून चुप करायची.

आज जर बाळ रडायला लागले तर गप्प करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल द्यावा लागतो. हा तंत्रज्ञानाचा विजय की मात्रुत्वाचा पराजय याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचारी वर्गाचे प्रश, ग्रंथालयाच्या विकासाचे नियोजन आदि विषयांवर खंडेराव सरनाईक, काशिनाथ गायकवाड, शैलेंद्र बदनापूरकर, रत्नाकर नंद, देविदास जिगे, प्रविण देशपांडे यांनी विचार मंथन केले.

सुत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी केले. प्रास्ताविक रावसाहेब अंभोरे यांनी तर सखाराम बोरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रावसाहेब अंभोरे, सचीव सुनिता अंभोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे शाम शेलगावकर, राजाराम चव्हाण, मुकूंदा खंदारे, प्रदीप जैस्वाल, फकरू कुरेशी, गोरख राऊत, समाधान कांबळे, सर्जेराव कुमकर, विश्वनाथ जमधडे, अनिकेत अंभोरे, स्थानिक मानव सेवा मंडळाने पुढाकार घेतला.

यांचा केला पुरस्कार देऊन गौरव
यावेळी ग्रंथालय संघातर्फे भोकरदन तालुक्यातील वरूड येथील स्वा.विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास शंकरराव बालेकर स्र्मुती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार. मठपिंपळगाव येथील क्रांतीसिंह नाना पाटील वाचनालयाचे देविदास जिगे यांना भगवानराव देशपांडे स्र्मुती उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार. नेर येथील वटेश्वर वाचनालयाचे ग्रंथपाल रत्नाकर नंद यांना अण्णासाहेब चव्हाण स्र्मुती उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...