आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मोसंबीचे व्यवस्थापन करून हवामान बदलावर मात करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी केले आहे. "बदलत्या हवामानात मोसंबी पिकाचे व्यवस्थापन" या विषयावर कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी द्वारे नुकत्याच आयोजित केलेल्या कृषि विज्ञान मंडळाच्या ३०६ व्या मासिक चर्चासत्रात डॉ. पाटील बोलत होते.
या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक कृषीरत्न विजय आण्णा बोराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, निवृत्त सहआयुक्त (जीएसटी) डॉ. नीलकंठ डाके, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी. टी. राऊत, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ए. आर. जोगदंड यांची उपस्थिती होती. डॉ. पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, सध्याच्या बदलत्या हवामानात मोसंबीची फळगळ, फळांवर काळे चट्टे पडणे, फळमाशी आणि फळांतील रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव, डिंक्या व डायबॅक, सिट्रस ग्रीनिंग ह्या मोसंबीतील प्रमुख समस्या आहेत. माती परीक्षण केल्याशिवाय मोसंबी लावू नये. दहा टक्क्यांपेक्षा अधिक चुनखडी असल्यास अशा जमिनीत मोसंबी लावू नये.
शिफारशी प्रमाणे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. मोसंबीची बाग विक्री करतांना चार पाण्यावर मोसंबीची बाग देण्याची पद्धत बंद करावी. न्युसेलर ही सर्वोत्कृष्ट जात असून या जातीचे उत्पन्न इतर जातींपेक्षा १५ टक्क्यांनी जास्त मिळते. काटोल गोल्ड आणि फुले मोसंबी हया न्यूसेलरच्याच प्रजाती आहेत. सिट्रस ग्रीनिंग हा रोग अन्नद्रव्यांच्या अभावामुळे होतो. लागवड करतांना स्वतःकडील रंगपूर खुंटावर तयार केलेले रोप वापरणे चांगले. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक जी. टी. राऊत आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ए. आर. जोगदंड यांनी "रस्त्यावरील अपघात आणि वाहतुकीचे नियम" या संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच सर्वांना रस्ता सुरक्षेतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी विजयआण्णा बोराडे यांनी मोसंबी लागवड करण्यापूर्वी शास्त्रज्ञांकडून आर्किटेक्ट प्रमाणे प्लॅन घ्यावा व मगच लागवड करावी असे सांगितले. मोसंबी फळांची ग्रेडिंग करणे आवश्यक असून जमिनीच्या निचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सबसॉयलरचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमात पाच प्रश्नांची सलग उत्तरे देणाऱ्या निवृत्ती चांदगुडे या शेतकऱ्याला मान्यवरांचे हस्ते चांदीचे पदक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.