आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मोती तलाव बनलाय धोबी घाट; वाहने धुण्यासाठी रोज होतेय गर्दी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बापलेकाच्या मृत्यूमुळे तलाव परिसरातील असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, नगरपालिकेने लक्ष देण्याची नागरिकांतून मागणी

जालना शहरातील मोती तलावात पाणी असल्याने अनेक जण या ठिकाणी पाेहायला येत आहेत. काही जण वाहने धुण्यासाठी, तर काही महिला कपडे धुण्यासाठीही येथे येतात. माशा पकडणाऱ्यांचेही घोळके या तलावाच्या कडेला बसून असतात. कुणी पाण्यात उतरून पोहतात, कुणी कपडे धुतात, कुणी वाहने धुतात. नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, चंदनझिरा पोलिसही कुणालाच हटकत नसल्यामुळे या ठिकाणी पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. सुरक्षिततेबाबत कुणीच बोलत नसल्यामुळे हा तलाव धोबी घाट बनला आहे. काही दिवसांपूर्वी पाण्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने तलावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वर्षभरात चार जणांचा या ठिकाणी बळी गेला. कुणी आत्महत्या, तर कुणाचा पोहताना मृत्यू झाला आहे.

जालना शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी साडेचारशे वर्षांपूर्वी मलिक अंबरने मोती तलावाची निर्मिती केली आहे. जसजसे जालना शहर वाढत गेले तसतसे या तलावाचे महत्त्व वाढत चालले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने काही वर्षांपूर्वी मोती तलावातील गाळ काढल्यामुळे तलावात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तसेच खोलीकरणही झाले आहे. दरम्यान, सध्या या तलावात चांगलाच पाणीसाठा असल्यामुळे उन्हाच्या काहिलीत अनेक जण या ठिकाणी पोहण्यास येत आहेत.

या परिसरातील अनेक घरातील महिला धुणे धुण्यासाठीही या ठिकाणी येतात. त्यांच्यासोबत असलेली लहान मुलेही पाण्यात पोहत असतात. कपडे धुणाऱ्या महिलांसह पोहणारे-माशा पकडणाऱ्यांना कुणीच हटकत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ऐन उन्हाच्या काहिलीत अनेक जण या ठिकाणी पोहण्यासाठी येतात. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी दोन जण पोहण्यासाठी आले. परंतु, पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

तलावाकडची घरे जातात पाण्यात
जिल्हा परिषदेच्या शासकीय इमारतींच्या कडेने अनेकांची घरे आहेत. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यास ही घरे पाण्यात बुडतात. परंतु, येथील ग्रामस्थांना घरे नसल्यामुळे या परिसरातील नागरिक याच ठिकाणी साप, विंचवांचा सामना करून याच ठिकाणी राहत असतात. तलावाच्या कडेला असलेल्या या नागरिकांचा प्रश्नही कायम आहे.

वाहने धुण्याचा पॉइंट
मोती तलावात वीटभट्टीच्या कडेने असलेल्या बाजूला दररोज अनेक दुचाकीस्वार, चारचाकी वाहने पाण्यात घालून चालक धूत असतात. काही जण याच पाण्यात पोहण्यासही उतरतात.

माशांनाच पकडतात
मोती तलावाच्या मेन पॉइंटहून काही जण माशांना पकडण्यासाठी याच ठिकाणाहून गळ टाकून बसत असतात. माशा पकडण्यासाठीही अनेक जण तलावाच्या पाण्याच्या कडेने बसत असतात.

रोडच्या कडेने कुणी तलावात पोहताना दिसले की सायरन वाजवतो
रोडच्या कडेने कुणी तलावात पोहत असताना दिसल्यास वाहनाचे सायरन वाजवून पोहणाऱ्यांना समज दिली जाते. परंतु, काही जण रस्ता नसलेल्या तलावाच्या कडेने पोहण्यासाठी येतात. यामुळे ते पोहणारे दिसत नाहीत. यामुळे त्यांना आवाज देणे शक्य होत नाही.
- आर. के. नाचन, पोलिस निरीक्षक चंदनझिरा, जालना.

बातम्या आणखी आहेत...