आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध भागांत वाहून जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रियेसाठी कुंडलिका नदीवर होत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीचे काम संथगतीने होत आहे. संरक्षण भिंतीचे काम घेतलेल्या ठेकेदाराने लोखंडाचे दर वाढल्यामुळे महिनाभर काम थांबविले. खोदकामातील माती, डब्बर नदीपात्रात टाकण्यात आल्याने नदीचे पात्र पूर्ण बुजले. संरक्षण भिंतही उभी राहिली नसल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी शहरात शिरण्याचा धोका आहे. दरम्यान, पालिकेच्या अंतर्गत जलवाहिनी प्रकल्पाचे काम होतेय. पाच वर्षे उशिराने तर सारवाडी डंपिंग ग्राउंड, सामनगाव येथील कचरा डेपो प्रकल्प अजूनही चालू झालेले नाहीत. नव्याने होत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे कामही असेच होत राहिल्यास हा प्रकल्पही रखडण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार अमृत अभियानांतर्गत नगरपालिकांच्या हद्दीत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्यवाहिनी, नागरी परिवहन, हरित क्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधा करण्यात येत आहे. जालना शहरातील अंबड बायपासवरील रोहणवाडी पुलाच्या बाजूने सांडपाणी हा प्रकल्प उभा राहत आहे. हा प्रोजेक्ट करून घेण्यासाठी पुणे येथील व्हिस्टाकोर इन्फा प्रा. लि. पुणे ही कंपनी नेमली आहे. परंतु, ज्या ठिकाणी मशिनरी उभी राहिल्या जाणार आहेत, यासाठी जालना शहरातील एका गुत्तेदाराला संरक्षण भिंतीचे काम करण्याचा कंत्राट दिले आहे. परंतु, लोखंडाच्या वाढलेल्या दरामुळे जास्त पैसे वाचणार नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने एक महिन्यापासून काम केले नाही.
काय आहे संरक्षक भिंतीला धोका?
६० कोटी रुपयांच्या खर्चातून ३० जूनपर्यंत सांडपाणी प्रकल्पाची संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे. परंतु, चार महिने उलटूनही या ठिकाणी केवळ खोदकाम झालेले आहे. मातीही नदीपात्रात पडलेली आहे. पाऊस पडण्यापूर्वी माती न उचलल्यास अथवा तयार होत असलेल्या संरक्षक भिंतीलाही धोका होऊ शकतो.
तब्बल महिनाभरापासून काम ठेवले बंद?
संरक्षण भिंत करणाऱ्या कंत्राटदाराने तब्बल महिनाभरापासून काम बंद ठेवले आहे. यामुळे नदीपात्रात टाकण्यात आलेली हजारो ब्रास माती पात्रात पडून आहे. ६० कोटींचा हा प्रोजेक्ट असून, संरक्षक भिंत झाल्यानंतर या ठिकाणी मशिनरी उभ्या राहण्याला वेग येणार आहे. या ठिकाणी मेन ट्रंक, ब्रीज आदी मशिनरी लागणार आहेत. संरक्षक भिंत झाल्यानंतर या ठिकाणी दगड, सिमेंट टाकून मशिनरीसाठी विशिष्ट रोलरने जागा तयार केली जाणार आहे.
नगरपालिकेच्या रखडलेल्या प्रकल्पांची अशी आहे स्थिती
नगरपालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सामनगाव परिसरात डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभा राहिला. परंतु, तो अजूनही सुरू झालेला नाही. त्या ठिकाणच्या मशिनरीही चोरीस गेल्या आहेत. बारा वर्षांपासून हा प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. तसेच डंपिंग ग्राउंडवर आणलेली मशिनरीही धूळ खात पडून आहे. यामुळे शहराच्या कचऱ्याचा प्रश्न अजूनही जशाचा तसा आहे.
शहरासाठी अंतर्गत जलवाहिनी अंथरली जात आहे. २०१६ पासून याचे काम सुरू आहे. २४ महिन्यांत ही योजना अंथरण्याचे आदेश होते. परंतु, अजूनही ही योजना पूर्ण न झाल्यामुळे जालनेकरांना दहा ते पंधरा दिवसांआड पाणी मिळत आहे. कंत्राटदाराने पैसे उचलून घेत पाचवेळा मुदतवाढ पालिकेकडून घेतली.
दोन महिन्यांत संरक्षण भिंत करणार; कामाला वेग देऊ
कुंडलिका नदीच्या पात्राच्या काठाला संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये हे काम होईल, अशी अपेक्षा आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम करण्याच्या दृष्टीने कामाला वेग दिला जाणार आहे.
- रमेश गौरक्षक, गुत्तेदार, संरक्षक भिंत.
प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतोय
नगरपालिकेंतर्गत असलेल्या कोणत्या प्रकल्पांची कामे कशामुळे थांबली, याला कोणती यंत्रणा जबाबदार आहे, मुदतीत काम का होत नाही, याबाबतचा लवकरच आढावा घेतला जाणार आहे.
- डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.