आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील समर्थ बेकरीत काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुण ज्ञानेश्वर बंडू शेडगे याचा झोपेतच गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून आरोपी सचिन पांडुसिंग परदेशी याने निर्घृण खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी अंबड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. निरेश्वर यांनी १ मार्च २०२३ आरोपी सचिन परदेशी (सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यास खूनप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तीर्थपुरी येथे शहागड रोडवर रामहरी तुळशीराम सुरोसे (कृष्णनगर, साडेगाव) व संतोष बापूसिंग परदेशी (कडा आष्टी, ता.जि. बीड) या दोघांच्या मालकीचे समर्थ बेकरीचे दुकान होते.
मृत ज्ञानेश्वर बंडू शेडगे (घुंगर्डे हदगाव, ता. अंबड) हा तीन वर्षांपासून बेकरीत कामाला होता. बेकरीवर मृत ज्ञानेश्वर शेडगे व सचिन परदेशी हे दोघेच होते. आरोपी सचिन परदेशी हा बेकरीतील पैसे चोरत असताना मृत ज्ञानेश्वर याने पाहिले होते. पैसे चोरल्याचे मालकास सांगेल या कारणावरून तसेच मृत ज्ञानेश्वर हा बेकरीमध्ये जास्त काम सांगत असल्याचा राग सचिनला अगोदरच होता. या कारणावरून आरोपीने त्या रात्री मृत ज्ञानेश्वर हा बाजेवर झोपी गेला असता धारदार कुऱ्हाडीने गळ्यावर, कपाळावर घाव घालून झोपेतच खून केला होता. फिर्यादी मृताचे वडील बंडू लक्ष्मण शेडगे, पंच साक्षीदार राम सुरवसे, संतोष परदेशी, दिगंबर परिहार, संदीप मापारे, प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर नाटकर, तपासी पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील वाल्मीक घुगे यांचा युक्तिवाद विद्यमान न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच कोर्ट पैरवी बळीराम खैरे, शंकर परदेशी, अवचार यांनी मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.