आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:सप्ताहात दोन विवाह लावून नानसी गावाने जपली बांधिलकी

प्रदीप देशमुख । मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नानसी पुनर्वसन येथे अखंड हरिनाम तथा भागवत कथा सप्ताहाच्या कार्यक्रमात दोन विवाह लावून गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. या वेळी कथा मंडपातील भाविक भक्तांनी वऱ्हाडी होऊन नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. मंगळवारी महाप्रसादाने या आगळ्या वेगळ्या सप्ताहाची सांगता करण्यात आली.

नानसी पुनर्वसन येथे १४ ते २० डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला. यामध्ये सतीश महाराज जाधव यांच्या रसाळ वाणीतून संगीत भागवत कथा निरूपण करण्यात आले. या दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशारोहणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व लेकी-बाळींना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी गावातील जावई मंडळींना पूजेचा मान देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सप्ताहाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केशव सिताराम बोने यांची कन्या कोमल हिचा विवाह महादेव मुंजाजी कमळगे यांचे सुपुत्र विनायक यांच्याशी लावण्यात आला. त्याचप्रमाणे कैलास लहाने यांची कन्या गीता हिचा विवाह रामभाऊ आकात यांचे चिरंजीव तुकाराम यांच्याशी लावण्यात आला. कुठलाही बडेजाव न करता आणि सर्व खर्चाला फाटा देत शिवाय हुंडा न घेता हे आदर्श विवाह भागवत कथा मंडपात संपन्न झाले. कथा मंडपातच मंगलाष्टके झाली आणि वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार घालून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. माऊली अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष तथा महाप्रसादाचे अन्नदाते सतीशराव निर्वळ यांनी यासाठी पुढाकार घेतला. धार्मिक सप्ताहात सर्व खर्चाला फाटा देत दोन आदर्श विवाह लावून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

सप्ताहात रामेश्वर महाराज नालेगावकर, दत्ता महाराज आनंदे, सतीश महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, प्रशांत महाराज चव्हाण, मुकुंद महाराज गात यांची कीर्तने झाली. सप्ताहाची सांगता ज्ञानोबा माऊली मुडेकर यांच्या काल्याच्या कीर्तन आणि महाप्रसादाने करण्यात आली. सप्ताह यशस्वी करण्यासाठी संतोष महाराज निर्वळ, उत्तमराव निर्वळ, अंकुशराव निर्वळ, बंडूनाना निर्वळ, अंकुशबप्पा निर्वळ, बबनराव निर्वळ, विष्णू निर्वळ आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, संगीत भागवतासाठी छबु महाराज राठोड, धीरज महाराज, शंकर महाराज बावस्कर यांनी साथ केली.

कथा श्रवणाने कल्याण
भागवत या ग्रंथामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टी प्राप्त होते. नामसाधनेचे महत्त्व कळते, शिवाय भगवंताशी कशा प्रकारे प्रीती केली जाऊ शकते हे कृष्ण आणि गोपिकांच्या संबंधाने भक्तांच्या लक्षात येते. कलियुगात तर नामसंकीर्तन आणि नामसाधना गरजेचीच आहे असे निरूपण सतीश महाराज जाधव यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...