आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाची भीती:पुण्याहून आलेल्या भाच्याला मामासह ग्रामस्थांनी नाकारले, घनसावंगी तालुक्यातील प्रकार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाकण येथून मिळेल त्या वाहनाने गाठले होते मामाचे खडका गाव

‘हमे बिमारीसे लढना है बिमार से नही’, हे वाक्य मागील चार महिन्यांपासून मोबाइलच्या काॅलरट्युनच्या माध्यमातून सर्वांनाच एेकायला मिळत आहे. असे असताना १६ वर्षीय भाच्याला मामाने घरातच प्रवेश नाकारला. एवढेच नव्हे तर कोरोना झाला असेल असे म्हणत ग्रामस्थांनीही गावाबाहेर हाकलले. हा प्रकार घनसावंगी तालुक्यातील खडका गावातील महारुद्र भगवान काळे १६, या मुलाबरोबर घडला. तो पुण्यातील चाकण येथे आपल्या पालकांबरोबर राहत होता.

आई-वडील अल्पभूधारक असलेल्या महारुद्र काळे हा पालकांबरोबर पुण्यातील चाकण येथे राहताे. वडील कंपनीत सिक्युरिटी गार्ड तर आई कंपनीत बागकाम करते. तर मुलगा हा आळंदी येथील वारकरी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेतो. मात्र, कोरोनामुळे मागील चार महिन्यांपासून तो घरीच होता. पाच दिवसांपूर्वी त्याने आपले मामाचे गाव असलेल्या घनसावंगी तालुक्यातील खडका गाठण्यासाठी पुण्यातून प्रवास सुरू केला. मिळेल त्या वाहनाने प्रवास करून ५ जुलै रोजी त्याने खडका गाव गाठले. मात्र, तेथील मामाने त्याला घरात घेण्यास नकार दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनीही ‘तू गावात येऊ नको’, अशी ताकीद दिल्याचे महारुद्र काळे याने सांगितले. परिणामी, या मुलाने पायी घनसावंगी त्यानंतर अंबड बसस्थानक गाठले. दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसल्याने अशक्त झालेला मुलगा कोरोनाबाधित आहे. की, काय अशीच शंका प्रथम दर्शनी येत होती. हा प्रकार अंबडमधील काेरोना सर्वेक्षण पथकाला कळल्यानंतर त्यांनी बसस्थानकात धाव घेत महारुद्र काळे याला जेवण देत चौकशी करून प्रवास इतिहास जाणून घेतला. त्याला कपडेही खरेदी करून देत आरोग्य कर्मचारी मयूर साडेगावकर, अरुण नाइकनवरे, विनोद गाढे, पोलिस नाईक संतोष कड या पथकाने सदरील मुलास ताब्यात घेऊन अलगीकरण कक्षात दाखल केले. अलगीकरण कक्षातून सुटी झाल्यानंतर महारुद्र काळे याने पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे जाणार असल्याचे सांगितले आहे.

महारुद्र भगवान काळे

प्रथम तपासणीत कोणतेही लक्षण नाही

सदरील मुलाला खोकला, ताप, सर्दी अशा स्वरूपाचे कोणतेही लक्षणे आढळून आले नसल्याचे आरोग्य पथकाने सांगितले. हा मुलगा पुण्यातील चाकण-घनसावंगी आणि अंबड असा प्रवास केल्याची प्रवास हिस्ट्री आहे.

0