आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंत्रणेचा गाफीलपणा:सिव्हिल हॉस्पिटलमधून रेमडेसिविर चोरीविषयी वर्तमानपत्रातून समजले : डॉ. भोसले यांचा दावा

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीसीटीव्ही फुटेज नुसता देखावा, मृताच्या खिशातूनही पैसे झाले होते गायब

कोरोनावर रामबाण उपाय ठरलेले रेमडेसिविर इंजेक्शन चोरून त्याची चढ्या भावात विक्री करणाऱ्या रॅकेटचा औरंगाबाद गुन्हे शाखेने मंगळवारी पर्दाफाश केला. यातील चौघे जालना येथील कोविड हाॅस्पिटलमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचेही चौकशीत पुढे आले. मात्र, पेपरमध्ये बातमी वाचूनच हा प्रकार समजल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी केला. दैनिक दिव्य मराठीत प्रसिद्ध वृत्ताचा संदर्भ देऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्याकडून प्रकरणाचा सविस्तर खुलासा मागवला आहे.

रुग्णांसाठी आलेले रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयातून चोरून मित्रांच्या मदतीने दहापट अधिक किमतीने काळ्या बाजारात विकणाऱ्या सात जणांच्या टाेळीला औरंगाबाद गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. यात जालन्यातील शासकीय कोविड हॉस्पिटलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात ५ ठिकाणी छापे टाकून पाच इंजेक्शन जप्त केले. अफरोज इक्बाल खान (२२), संदीप सुखदेव रगडे (३२), प्रवीण शिवनाथ बोर्डे (२७), नरेंद्र मुरलीधर साबळे (३३, सर्व रा. बदनापूर, जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जालन्यात कोरोनाने हाहाकार केला असून मृतांसह बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील गंभीर रुग्णांसाठी डॉक्टरांकडून रेमडेसिविर इंजेक्शनची शिफारस केली जात असल्यामुळे अचानक मागणीत वाढ झाली व इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. यातूनच काळ्या बाजारात चढ्या दराने रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करणारे रॅकेट जालन्यात सक्रिय झाल्याचे पोलिसांच्या कारवाईतून पुढे आले आहे.

सिव्हिलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू
जिल्हा रुग्णालयासह कोविड हॉस्पिटलमधील प्रत्येक वॉर्ड व बाहेरील हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले अाहेत तर याचे नियंत्रण जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या दालनात आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयावर २४ तास सीसीटीव्हीची पहारा असतो. यासोबतच रुग्णालयात पोलिस चौकी असून या ठिकाणीही ड्यूटीवर पोलिस तैनात असतात. एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असूनही कोविड हॉस्पिटलमधून रेमडेसिविर इंजेक्शन चोरी गेले, एवढेच नव्हे तर याची साधी माहितीही रुग्णालय प्रशासनाला नाही. यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेची वस्तू आहे की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

दिव्य मराठी’तील वृत्ताचा संदर्भ देऊन मागवला खुलासा
‘कोरोना योद्धाच मृतांच्या नावाने करत होता ‘रेमडेसिविर’ची चोरी’ व ‘रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीतील चार जण बदनापुरातील’ या मथळ्याखाली दैनिक दिव्य मराठीत बुधवारी प्रकाशित वृत्ताचा संदर्भ देऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्याकडून खुलासा मागवला आहे. यासोबतच बातमीचे कात्रणही पाठवले आहे.

रेमडेसिविर विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाल्याचे पोलिसांच्या कारवाईतून आले पुढे
कोविड हॉस्पिटलमधून रेमडेसिविर चोरून नेऊन त्याची औरंगाबादेत विक्री केल्याचे बातमी वाचूनच समजले. लेबर सप्लाय करणाऱ्या एजन्सीने नियुक्त केलेले हे कर्मचारी असून नोटीस दिली आहे. चौकशीसाठी एक समितीही नियुक्त केली आहे.अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई करण्यात येईल. -डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना.

रेकॉर्ड अपडेट, इंजेक्शन चाेरीची माहिती कुणीच दिली नाही
जिल्हा रुग्णालयासह कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलेल्या सर्व रेमडेसिविर इंजेक्शनचे रेकॉर्ड अपडेट आहे. इंजेक्शन चोरी झाल्याचे कुणी सांगितलेही नाही. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी जालन्यातून इंजेक्शन चोरून नेल्याचे सांगितल्याचे पेपरमध्ये वाचले. यामुळे नेमके इंजेक्शन चोरी झाले तर किती व कसे याची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसले यांनी तीन डॉक्टरांची समिती नेमली आहे.

मृताच्या खिशातून पैसे चोरीचे प्रकरण ताजे
कोविड हॉस्पिटलमधील मृताच्या खिशातील रोख ३६ हजार रुपये, चांदीची अंगठी, एटीएम, आधार, पॅन व मतदान कार्ड काढून घेत मोबाइलच्या साह्याने फोन पेवरून ६८०० रुपयेसुद्धा लंपास केल्याची घटना १५ एप्रिलला रोजी घडली. कदीम पोलिसांनी मोमीन मोहसीन मोमीन नशीरविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासकामी सायबर पोलिसांकडे वर्ग केले आहे. आरोपीने फोन पेतून ६८०० रुपये काढल्याची कबुली दिली.तर अायसीयू वॉर्डातून परस्पर जनरल वॉर्डात शिफ्ट केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती नेमलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...