आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नसोहळ्यात प्री-वेडिंग, डीजे, हजारो पाहुणे, मित्रमंडळीची उपस्थिती, सोहळ्यातील मौजमजा, विविध अन्नपदार्थ यावर लाखोंचा खर्च करून अनेक जण कर्जबाजारी होतात. यामुळे कौटुंबिक अनेक समस्या उभ्या राहून काही वेळा आत्महत्यांच्या घटनाही घडतात. यामुळे हुंडा न घेण्यासह व देण्यासह अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अगदी साध्या पध्दतीने विवाह सोहळे पार पाडण्याचा पायंडा लाड गवळी समाजाने सुरू केला आहे. वर्षभरात ४० तरुणांचे साध्या पद्धतीने समाजाच्या कार्यालयात विवाह सोहळे पार पडले आहेत. अगदी साध्या पध्दतीने मुहूर्तावरच होणारे हे लग्न सोहळे इतर समाजासाठी आदर्शदायी ठरू लागले. विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा भव्यदिव्य होण्याचा अनेक पालकांना मोह आवरता येत नाही.
परंतु, या सोहळ्यावर झालेला अनावश्यक खर्च, यातून कर्जबाजारीपणा, हुंडा पध्दत यामुळे कर्जबाजारी झालेल्या अनेक पालकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे नवरदेव व नवरी अशा दोन्ही कुटुंबीयांवर कुठलाही आर्थीक भार पडणार नाही, या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात लाड गवळी समाजाने साध्या पध्दतीनेच विवाह सोहळे सुरू केले आहेत. जालन्यातही या विवाह सोहळ्यांचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. अनावश्यक खर्चामुळे श्रीमंत वर्गावर फारसा परिणाम होत नाही. परंतु, मध्यमवर्गीय शेतकरी आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या परिवारांवर त्याचा प्रभाव आणि ताण पडत आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या परिवारावर या सर्व प्रकारचा आर्थिक ताण निर्माण झाल्याने त्यांच्या कर्जात देखील वाढ झाली आहे. जालना शहरातील जुना जालना भागातील गवळी मोहल्ला येथे समाज मंदिर करण्यात आले आहे. समाजातील सर्वच विवाह सोहळे या ठिकाणी होत आहेत. हुुंड्याचा विषय आला की, सर्व समाजच त्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आदर्श लाड गवळी समाजाने सुरू केला आहे.
प्रत्येकाने हुंडा न घेण्याची पद्धत केली सुरू
डीजे लावल्यास तरुणांच्या नाचण्यासह कुठे मद्य विक्री झाल्यास अनेक तरुण या ठिकाणी नाचत असल्याने अनेक लग्न उशिराने लावण्याला कारण ठरत आहे. यामुळे लाड गवळी समाजाने प्रत्येकाने लग्न समारंभात डीजे न लावणे, हुंडा न घेणे, देणे ही पद्धतच समाजाने सुरू केली आहे.
राज्यभरात होतोय अवलंब
लाड गवळी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात याचा अवलंब केला आहे. हुंडा पद्धतच बंद केल्याने आतापर्यंत एकही फारकतीचे प्रकरण समोर आले नाही. शिवाय, तरुणांनी व्यसनांपासून लांब ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवल्या जात आहे. समाजातील ज्येष्ठ मंडळीसह तरुणांची साथ मिळत असल्याने हा आदर्श निर्माण करु शकत आहे. इतर समाजांनीही याचा अवलंब केल्यास कुणीही कर्जबाजारी होणार नाही. - गणेश सुपारकर, माजी अध्यक्ष,लाड गवळी समाज, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.