आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सोमवार व मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात रब्बी पिके भुईसपाट झाली. ऐन काढणी, सोंगणीला आलेली पिके आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. मात्र, जिल्ह्यात शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान नसल्याची प्राथमिक माहिती आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.
तर, वीज पडून ७ जनावरे दगावल्याचे ते म्हणाले. यामुळे प्रत्यक्षात नुकसान होऊनही प्रशासनाच्या लेखी तशी नोंद होत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. गतवर्षी अतिवृष्टी, पूर, परतीच्या मान्सूनमुळे खरिपाची नासाडी झाली होती. राज्य सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदतीची घोषणा केली, मात्र ६ ते ७ महिने होत आले तरीही मदत मिळाली नाही.
जालना जिल्ह्यातील ३ लाख ८४ हजार ९४ शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. गतवर्षीच्या संकटाची सल कायम असताना पुन्हा तीन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने गाठल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. सुरुवातीला कापूस, सोयाबीन, मका, मूग, उडीद व आता रब्बीतील हरभरा, ज्वारी, गहू पिकांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला असून सरकारने तत्काळ मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोकप्रतिनिधींकडून थेट बांधावर जाऊन पाहणी केली जात आहे, मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.