आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संख्येमध्ये वाढ:शेवटच्या दिवशी ४ हजारांवर नामनिर्देशनपत्रे, आॅफलाइनमुळे इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुकांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत नामनिर्देशनपत्रे भरली. दरम्यान, शुक्रवारी एकच दिवस आॅफलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत दिल्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली व चार हजारांवर नामनिर्देशनपत्रे आली. रात्री उशिरापर्यंत संकलन सुरू होते. साेमवारी सर्व अर्जांची छाननी होणार असून यातून कुणाचा अर्ज पात्र-अपात्र होतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने गत महिन्यात ९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे निवडणूक कार्यक्रम राबवण्याचे घोषित केले. यानुसार २८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र सादर करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. यात १२ अर्ज सरपंच तर एक अर्ज सदस्य पदासाठीचा होता. पुढे २९, ३० नोव्हेंबर व १ डिसेंबरपर्यंत सरपंचपदासाठी ६७८ तर सदस्य होण्यासाठी २७०६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

मात्र, ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे भरताना अडचणी येत असल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची मागणी इच्छुकांकडून करण्यात आली. याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी २ डिसेंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास मुभा दिली. शिवाय सकाळी ११ ते दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली. यामुळे इच्छुकांचा आकडाही वाढला व काेणत्याही कारणास्तव आपला अर्ज बाद होऊ नये म्हणून एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्रे भरण्यात आली. यामुळे त्या-त्या तहसील कार्यालयात सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

१८ डिसेंबरला मतदान, २० रोजी निकाल
ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली त्या ग्रामपंचायतींच्या जागा वगळता येत्या १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. तसेच २० रोजी मतमोजणी व निकाल घोषित केला जाणार असून मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. शेवटी २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

गर्दीमुळे पोलिस बंदोबस्त तैनात
जालना शहरातील अंबड बायपास मार्गावर असलेल्या तहसील कार्यालयात सकाळपासूनच इच्छुकांची लगबग सुरू झाली. ११ वाजेपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होताच गर्दी वाढत गेली व रस्त्याच्या दुतर्फा ५०० मीटरपर्यंत गर्दी झाली. दुचाकी, चारचाकी वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे चक्क महामार्गालगतच वाहने उभी करावी लागली.

बातम्या आणखी आहेत...