आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरिपात शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका बसला होता. परंतु जलसाठे तुडुंब असल्याने शेतकऱ्यांनी निराश न होता नव्या जोमाने रब्बीची लागवड केली. मात्र, ऐन हातातोंडाशी आलेला घास होळी व धूलिवंदनाच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने हिरावला गेला आहे. यामुळे रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा ही पिके आडवी झाली असून जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार ३० हेक्टरचे नुकसान झाले आहे. गतवर्षी खरिपातील सप्टेंबर-आॅक्टोबरमधी ल ३ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा छदामही मिळाला नाही. आता पुन्हा रब्बीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे मदत नेमकी कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. अगोदर खरीप व आता रब्बी अशी दोन्हीही हंगामातील पिके वाया गेल्यामुळे शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात कडाक्याची थंडी राहते, जी पिकांसाठी पोषक ठरते.
मात्र, असे न होता थंडीचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. त्यानंतर पिकांना जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान वाढत्या धुक्याचा फटका बसला आहे. ऐन फुलोरा अन् दाणे भरण्याच्या स्थितीत धुक्यामुळे गव्हाला फटका बसला. आता काढणीच्या स्थितीतील पिकांना बेमोसमी पावसाचा फटका बसला. दरम्यान, बदनापूर, भोकरदन, जालना, जाफराबाद या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
विमा कंपनीला नुकसानीची ७२ तासांत माहिती द्या
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी हरभरा, गहू किंवा इतर पिकांचा विमा उतरवण्यासाठी एचडीएफसी इर्गो या कंपनीकडे रक्कम भरली आहे. त्या कंपनीच्या प्रतिनिधींना किंवा अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची माहिती कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भोकरदन, जाफराबादेत वीज पडून सहा जनावरे दगावली
जिल्ह्यात गत ४८ तासात वीज पडून सहा जनावरे दगावली असून यात चार गायी व दोन म्हशींचा समावेश आहे. यापैकी दोन गायी व एक म्हैस भोकरदन तर दोन गायी व एक म्हैस जाफराबादेतील असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.सोमवार, मंगळवार दोन्ही दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. आठही तालुक्यात मिळून एकूण १.३० मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे पर्जन्यमापकावरील नोंदीत म्हटले आहे, मात्र पिकांच्या नुकसानीची आकडेवारी बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त नव्हती. यामुळे वीज पडून जनावरे दगावल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हात तृणधान्ये, कडधान्ये, अन्नधान्ये, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल आदी पिकांची लागवड झाली आहे.
आधीच शेतमालाला भावनाही, त्यात तडाखा, शासनाने मदत द्यावी
मागील हंगामात बेमोसमी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. जवळपास अर्धे पीक पाण्यात होते. गुडघाभर पाण्यातून सोयाबीनची काढणी केलीहोती. तसेच शेंगांना कोंब फुटले होेते.शिवाय हाती आलेले सोयाबीन बेभावविकावे लागले. या नुकसानीचेमहसूल तसेच कृषी विभागाकडूनपंचनामे करून अहवाल शासनालादिला होता. याची मदत मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत हातात दमडीही आली नाही. पीक विम्याची रक्कमही मिळाली नाही. या हंगामात दीड एकरावर ज्वारीची लागवड केली आहे. सध्या हे पीक काढणीला आले आहे. दाणेही चांगले भरले आहेत. मात्र, ज्वारीचे पीक पूर्णत: आडवे झाले आहे. याची काढणी करणे हे माेठे खर्चिक काम होणार आहे. सोंगणीसाठीही मजुरांकडून अडवणूक होईल. शिवाय गुणवत्ता खराब झाल्याने याला चांगला दरही मिळणार नाही. शेतमाल वाया गेल्यानंतर शासनाच्या मदतीने काय होणार आहे? आता पंचनामा होईल. त्यानंतर मदतीची घोषणा होईल. प्रत्यक्षात मदत कधी मिळेल हे कुणालाच माहीत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. यापेक्षा आमचा शेतमालच लाखमोलाचा आहे. -सीताराम बबन गिराम, शेतकरी सिंधीकाळेगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.