आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:नैराश्यग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनेद्वारे आता सामाजिक, आर्थिक सुरक्षा

बाबासाहेब डोंगरे| जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी, नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर यातून नैराश्य आलेल्या जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांनी १ जानेवारी ते १४ नोव्हेंबर या ३१८ दिवसांत आत्महत्या केल्या. हे सत्र अद्यापही थांबलेले नसून आत्महत्याग्रस्त भागातील शेतकरी खचत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन नैराश्य ग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे मनोबल उंचावत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या हेतूने आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सुरक्षितता पाहणीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबत सर्व तहसीलदारांना माहिती संकलनाचे आदेश दिले आहेत. यानंतर पात्र कुटुंबांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे.

बियाणे पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या जालन्यात कधी ओला, कधी कोरडा दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, सततचा पाऊस बदलत्या हवामानामुळे पिकावरील रोगराई आदी संकटांची मालिका नेहमीचीच होऊन बसलीय. यातूनच नापिकी, पिकांची नासाडी झाल्यामुळे अनेकदा बी-बियाणे, खत, औषधांचा खर्चही वसूल होत नाही. दुसरीकडे शेतीमालास अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेती तोट्याचा व्यवसाय झाला आहे.

यामुळे उदरनिर्वाहासह मुला-बाळांचे शिक्षण, आरोग्य, लग्न, देणी-घेणी अशा प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागत आहे. शेतीची हमी नसल्यामुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे.

दिवस-रात्र राबूनही हाती काहीच नाही उलट कर्जाचा डोंगर वाढत असल्याने नैराश्य ग्रस्त शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. हे दुष्टचक्र थांबवून शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून मनोबल उंचावण्यासाठी नैराश्य ग्रस्त शेतकरी कुटुंबियांना सुरक्षितता देण्यासाठी पुढाकार घेत घरोघरी जावून माहिती संकलन केली जात आहे.

पात्र ८० प्रकरणात ८० लाखांची मदत
जिल्ह्यात झालेल्या १०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्येपैकी ८० प्रकरणे मदतीस पात्र ठरली असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे ८० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर १८ प्रकरणे अपात्र असून ११ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

माहिती संकलनासाठी गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांची घेणार मदत
गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, कृषि सहाय्यक तसेच शिक्षक यांची मदत घेण्यात ये असून या माध्यमातून शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित केली जात आहे. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी सर्व तहसीलदारांना याबाबत आदेश दिले आहेत.

ही माहिती केली जाणार संकलित
प्राथमिक व कौटुंबिक माहिती, सामाजिक सहभाग, कल्याणकारी योजनांचा लाभ, सध्य स्थितीत कर्ज, कौटुंबिक उपजिविका, मागील वर्षातील पीक व उत्पादन, कृषीविषयक योजनांचा लाभ घेतला काय, पशुधन, स्थलांतर आदी माहिती संकलित केली जाणार असून व्यक्तीमधील ताण, नैराश्य ओळखण्यासाठी प्रश्नावली सुद्धा देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...